जीवन संपविलेल्या तरुणाचा महिनाभराने मोबाइल ऑन, व्हिडिओ पाहून कुटुंबाला बसला धक्का
By सुमित डोळे | Published: June 12, 2024 12:03 PM2024-06-12T12:03:17+5:302024-06-12T12:03:34+5:30
तरुणाने जीवन संपविण्यापूर्वीचा धक्कादायक व्हिडीओ महिन्याने समोर, महिलेवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : तरुणाच्या आत्महत्येच्या महिनाभरानंतर त्याचा मोबाइल सुरू केला असता त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ समोर आला. त्याने त्यात केलेल्या आरोपानंतर त्याच्या आत्महत्येस जबाबदार धरत एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंका उर्फ पूजा सोनवणे (३५, रा. आंबेडकरनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
देवीकल्याण लक्ष्मण खिरे (६४, रा. टी. व्ही. सेंटर) यांचे व लंकाचे जमिनीवरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत. त्यातून लंकाने खिरे कुटुंबावर मारहाणीचा गुन्हादेखील दाखल केला होता. १३ मे रोजी सायंकाळी खिरे कुटुंब नातवाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. तेव्हा देवीकल्याण यांचा अविवाहित मुलगा सुभाष (३४) हा अचानक कार्यक्रमातून घरी गेला. देवीकल्याण यांनी त्याच्यासाठी जेवणाचा डबदेखील घरी नेला. मात्र, तोपर्यंत सुभाष यांनी जिन्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दु:खात असल्याने देवीकल्याण यांचे त्याच्या मोबाइलकडे लक्ष गेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना सुभाष यांचा मोबाइल बंद अवस्थेत आढळून आला.
महिनाभराने मोबाइल ऑन, कुटुंबाला बसला धक्का
देवीकल्याण यांनी भाचा गणेशकडून मोबाइल सुरू करवून घेतला. तो तपासला असता काही व्हिडीओ आढळले. त्यापैकी सुभाष यांनी १३ मे रोजी रात्री ११:०० वाजता आत्महत्येपूर्वी तयार केलेला होता. त्यात त्यांनी लंकावर गंभीर आरोप केल्याचे निदर्शनास आले. लंकामुळेच मी आत्महत्या करत असल्याचा सुभाष यांनी व्हिडीओत उल्लेख केला. सदर मोबाइलसह कुटुंबाने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर लंकावर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक शंकर शिरसाट तपास करत आहेत.