पोळ्यानिमित्त देवीला नारळ फोडून परत येताना शेतकरी नदीत वाहून गेला; शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 07:58 PM2024-09-02T19:58:23+5:302024-09-02T19:58:53+5:30
शेतकऱ्याला शोधण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली असून अद्याप यश मिळाले नाही.
फुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील शेवता येथील गिरीजा नदीच्या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना सोमवारी चार वाजेच्या दरम्यान घडली. नदीच्या पलीकडे असलेल्या देवीला नारळ फोडून परत येत असता ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकऱ्याला शोधण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली असून अद्याप यश मिळाले नाही.
शेवता बुद्रुक व शेवता खुर्द या दोन गावाच्या मधून गिरीजा नदी वाहते. सोमवारी पोळा सण असल्याने शेवता बुद्रुक येथील शेतकरी रावसाहेब नाना बेडके ( ४५) हे दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान शेवता खुर्द येथील देवीला नारळ फोडण्यासाठी गेले होते. जाताना नदीला पाणी कमी होते पण ते नारळ फोडून आल्या नंतर पाणी वाढले. परत येत असतान पाण्याचा अंदाज न आल्याने ते वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात वाहून गेले. काही ग्रामस्थांनी हा प्रकार पहिला. मदतीसाठी आरडाओरड केला पण पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने वेळीच काही करता आले नाही. दरम्यान, शेवता येथील घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा व एनडीआरएफला कळविण्यात आलेले आहे. शोध सुरू असल्याची माहिती तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांनी दिली आहे.
पूल उभारण्याची अनेक वर्षांची मागणी
शेवता खुर्द व शेवता बुद्रुक या दोन गावाच्यामधून गिरजा नदी वाहते. दोन्ही गावातील शेतकऱ्याच्या जमिनी दोन्ही कडे आहे. त्यांना नियमित नदी ओलांडावी लागते. तसेच नियमित रहदारी देखील खूप आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नदीवर पुल उभारण्याची मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थांची आहे. २० सप्टेंबर २०२२ ला आम्हाला शाळेत जायचे आहे नदीवर पूल बांधून द्यावा, अशी मागणी करीत अनेक विद्यार्थ्यांनी नदीपात्रात उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी देखील आंदोलन केले होते, पण अजूनही पुलाच्या मागणीला शासनाने लक्ष दिले नाही. शेतकरी संघटनेचे साईनाथ बेडके यांनी या मागणीसाठी मंगळवार पासून नदीपात्रात जलआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.