पारंपरिक पिकांना फाटा, अद्रक उत्पादनातून तांबेवाडीच्या शेतकऱ्यांनी कमावले तब्बल ४५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:17 AM2024-04-01T11:17:18+5:302024-04-01T11:20:01+5:30
तांबेवाडी येथील अद्रक बियाणे हे निर्दोष असते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अद्रक बियाणांना देशभरातून मागणी असते.
छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गावर अवलंबून न राहता, फुलंब्री तालुक्यातील तांबेवाडी येथील ७२ शेतकरी कुटुंबांनी त्यांच्या शेतात शेततळे खोदून बाराही महिने शेतीला पाणी उपलब्ध केले. एवढेच नव्हे, तर पारंपरिक पिकांना फाटा देत प्रामुख्याने अद्रकाची मुख्य पीक म्हणून लागवड सुरू केली. दहा ते बारा वर्षांपासून तांबेवाडीत अद्रक उत्पादनातून कोट्यवधींचे उत्पन्न होत आहे.
यावर्षी येथील शेतकऱ्यांनी अद्रक उत्पादनातून तब्बल ४५ कोटी रुपये कमावत शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी या गावातील ७२ शेतकरी शेतातच घर करून राहतात. तांबे आडनाव असलेल्या या शेतकऱ्यांच्या वसाहतीला तांबेवाडी हे नाव पडले आहे. २०१२ पर्यंत येथील शेतकरी ज्वारी, बाजरी, मका, कापूस या पारंपरिक पिकांची लागवड करीत असत. सिंचनासाठी मुबलक पाणी नसल्याने त्यांना रब्बी पिकांचे उत्पादनही त्यांना घेता येत नव्हते. मात्र, २०१२ पासून आतापर्यंत तांबेवाडीतील प्रत्येक शेतकरी कुटुंबाने त्यांच्या शेतात लहान, मोठ्या आकाराचे शेततळे खोदले. पावसाळ्यात ही कुटुंबे शेततळी विहिरीतील पाणी उपसून पाण्याने तुडुंब भरून घेतात.
विहिरीचे पाणी शेतीला कमी पडू लागताच शेततळ्याच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर सुरू करतात. शेततळ्याचे पाणी उपलब्ध झाल्यापासून तांबेवाडीतील सर्वच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात अद्रकाची लागवड केली आहे. गादी वाफा पद्धतीने अद्रकाच्या लागवडीसोबत रासायनिक आणि जैविक खतांचा निम्मा, निम्मा वापर करणे, जमिनीत जास्तीत जास्त जिवाणूंची संख्या वाढेल, यासाठी कंपोस्ट खताचा वापर जाणूनबुजून करण्यात येतो. यातून त्यांना दरवर्षी अद्रकाचे चांगले उत्पादन होत असते. यावर्षी येथील शेतकऱ्यांनी तब्बल २५० एकरवर अद्रकाची लागवड केली होती. दोन महिन्यांपासून अद्रकाचे उत्पादन सुरू झाले आहे. तांबेवाडीच्या अद्रकाची गुणवत्ता सर्वोत्तम असल्याने बाजारात १० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर त्यांना मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी अद्रक उत्पादनातून येथील प्रत्येक कुटुंबाने २० लाख ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. येथील ७२ कुटुंबांनी अद्रक उत्पादनातून तब्बल ४५ कोटी रुपयांची कमाई करून राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
तांबेवाडीच्या अद्रक बियाणास देशभर मागणी
तांबेवाडी येथील अद्रक बियाणे हे निर्दोष असते. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अद्रक बियाणांना देशभरातून मागणी असते. बाजारात अद्रकाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असला तर बियाण्याला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. शेतकरी तांबेवाडी येथे येऊन अद्रकाचे बियाणे घेऊन जातात.
१२ एकरांवर अद्रकाची लागवड
शेततळ्यामुळे बाराही महिने शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने तांबेवाडीचे चित्रच बदलले. आमची २५ एकर शेती आहे. यातील १२ एकरांवर अद्रकाची लागवड करण्यात आली होती. यातून एकरी ९०० क्विंटल उत्पन्न मिळाले. आम्हाला सुमारे दीड कोटीचे उत्पन्न मिळाले.
- बाबा तांबे पाटील, शेतकरी, तांबेवाडी.
तांबेवाडीचा आदर्श सर्वच शेतकऱ्यांनी घ्यावा
तांबेवाडी येथील शेतकऱ्यांनी अद्रक उत्पादनातून रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळाल्याचे कळताच, आपण शुक्रवारी सकाळी तांबेवाडीला भेट दिली. ७२ शेतकरी कुटुंबांनी अद्रकाची लागवड केल्याचे दिसून आले. प्रत्येक कुटुंबाची एक ते दोन शेततळी आहेत. शेततळ्यामुळे त्यांना बाराही महिने सिंचनाची सुविधा झाल्याने अद्रकासह अन्य पिके ते घेतात. यंदा अद्रकाला चांगला दर मिळत असल्याने २५० एकरांवरील अद्रक उत्पादनातून तांबेवाडीकरांनी ४५ कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले.
--- डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक.