घाटी रुग्णालयातील आकडे चिंताजनक, पण का आहे ही परिस्थिती ?
By संतोष हिरेमठ | Published: October 6, 2023 05:28 PM2023-10-06T17:28:35+5:302023-10-06T17:28:46+5:30
रुग्णालयावर वाढला भर, सोयी-सुविधा मात्र पडताहेत अपुऱ्या
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला. हे आकडे चिंता व्यक्त करणारे आहेत. प्रत्येक मृत्यूसाठी वेगवेगळे कारण आहे. मात्र, घाटी रुग्णालयात ही परिस्थिती का येत आहे, यावर विचारमंथन करण्याची वेळ आली आहे, असे घाटीतील डाॅक्टरांनीच सांगितले.
घाटी रुग्णालयात मंगळवारी अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. यावेळी घाटीतील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.एक हजार रुग्णांमागे नऊ रुग्णांचा मृत्यू ही सामान्य बाब आहे. दोन हजार रुग्णांमागे १८ पेक्षा अधिक मृत्यू झाले तर काही तरी चुकते, असे गृहित धरावे. घाटीत २४ तासात १४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे घाटीतील मृत्यूची स्थिती तशी नियंत्रणात असल्याचे बैठकीत घाटीतील डाॅक्टरांनी म्हटले.
घाटीतील डाॅक्टरांनी मांडलेली स्थिती
- १,१७७ खाटा, प्रत्यक्षात दोन हजारांपर्यंत रुग्ण भरती राहतात.
- क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण. कोणालाही नाकारले जात नाही.
- मनुष्यबळ मंजूर खाटांनुसार. त्यातही अनेक पदे रिक्त.
- घाटी टर्शरी केअर सेंटर आहे. येथे गंभीर रुग्ण येणे अपेक्षित. परंतु, सामान्य रुग्णांचाही भार आहे.
- ग्रामीण भागासह मराठवाड्यातून गंभीर रुग्ण घाटीत रेफर.
- खासगी रुग्णालयात मृत्यू नको, म्हणून गंभीर रुग्ण शेवटच्या क्षणी घाटीत रेफर.
- जिल्हा रुग्णालय, महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याची ओरड.
- सामान्य प्रसूतीचा भारही घाटीवरच. रोज ५० ते ७० प्रसूती.
- महापालिका आरोग्य विभागाच्या रुग्णालयात वर्षभरात जेवढ्या प्रसूती होतात, तेवढ्या प्रसूती घाटीत एक-दोन दिवसांत.
- जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी हातभार लावावा. त्यातून घाटीवरील भार कमी होईल.