पहिला प्रयत्न फसला, चोरट्यांनी पिच्छा नाही सोडला; पंक्चर काढायला थांबताच ३ लाख ढापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:08 PM2023-07-25T12:08:16+5:302023-07-25T12:08:40+5:30
पहिला प्रयत्न फसूनही चोरांकडून दूरवर पाठलाग, लिंक रोड मार्गे शहराबाहेर
छत्रपती संभाजीनगर : बाबा चौकातील आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढून निघालेल्या व्यावसायिक नवाब जमीर खान पठाण यांची तीन लाख रुपयांची बॅग चोरांनी लंपास केली. सोमवारी दुपारी तीन वाजता क्रांती चौकात ही घटना घडली. रात्री उशिरा याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पठाण ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. सोमवारी ते दुचाकीने बँकेत गेले. तीन वाजता तीन लाख रुपये घेऊन ते दुचाकीने घराच्या दिशेने निघाले. मात्र, क्रांती चौकात जाताच दुचाकीचे चाक पंक्चर झाले. बँकेपासूनच चोर त्यांचा पाठलाग करत होते. क्रांती चौकातील पेट्रोलपंपावर पंक्चर काढण्यासाठी थांबल्यावर चोरटे बॅग लंपास करून सुसाट पसार झाले. घटनेची माहिती कळताच क्रांती चौकचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांनी धाव घेतली.
पहिला प्रयत्नात पठाण सतर्क राहिले, पण...
पठाण बँकेतून बाहेर पडताच चोरांनी त्यांची बॅग हिसकावण्याचे नियोजन केले होते. पठाण यांच्याजवळ दोन शंभर रुपयांच्या नोटा फेकून त्यांना तुमचे पैसे पडल्याचे सांगितले. पठाण सतर्क राहिले व माझे पैसे नाहीत, असे म्हणून प्रतिसाद न देता निघून गेले. परंतु तरीही चोरांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला आणि त्यातच पठाण यांची दुचाकी पंक्चर झाली. पंपावर पंक्चर चालकाला पैसे देताना त्यांनी पैशांची बॅग दुचाकीवर ठेवली आणि तीच संधी चोरांनी साधली. पुढे मोंढा, आकाशवाणी, उस्मानपुरा ते लिंक रोड, वाळूजमार्गे चोर शहराबाहेर पडले. एकाने हेल्मेट तर एकाने मास्क घातला होता.