चलो बुद्ध की ओर! चर्मकार समाजाचा राज्यातील पहिलाच धम्मदीक्षा सोहळा औरंगाबादेत
By विजय सरवदे | Published: October 12, 2022 12:08 PM2022-10-12T12:08:18+5:302022-10-12T12:11:59+5:30
१४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीक्षाविधीची जय्यत तयारी
औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रावण गायकवाड यांच्यासह सुमारे शंभरहून अधिक चर्मकार बांधवांना थायलंडचे भदन्त विनयसुथी महाथेरो हे धम्मदीक्षा देणार आहेत. चर्मकार समाजाचा हा महाराष्ट्रातील पहिलाच धम्मदीक्षा सोहळा असून, हा सोहळा १४ ऑक्टोबर रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी चार वाजता होणार आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्रावण गायकवाड यांनी सांगितले की, दीक्षाविधी सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर या विशेष उपस्थित राहणार असून, भदन्त बोधीपालोजी महाथेरो, भदन्त विशुद्धानंदबोधी महाथेरो, भदन्त नागसेनबोधी थेरो, आर्या भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी, भन्ते ॲड. बुद्धपाल व भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये हा धम्मदीक्षा सोहळा होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते गगन मलिक व प्रमुख वक्ते म्हणून माजी न्यायाधीश सी. एल. थूल (मुंबई), कॅप्टन नताकित, अच्युत भोईटे (मुंबई), भीमराव हत्तीअंबिरे, भारत पाटणकर (सांगली), फारूख अहेमद (नांदेड), लक्ष्मणदादा घुमरे (बुलढाणा), तनू आंबेकर (मुंबई), मंगलाबाई खिंवसरा (औरंगाबाद) हे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याचे मुख्य संयोजक मिलिंद दाभाडे असून ॲड. धनंजय बोडे, विजय मगरे, सचिन निकम हे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी आंबेडकरी व परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांना विशेष आमंत्रित करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टेज कमिटी, नियोजन कमिटी, प्रचार कमिटी, नियंत्रण व देखरेख कमिटी, भोजन कमिटी व स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
यावेळी बाळू गंगावणे, नानासाहेब शिंदे, विजय मगरे, सचिन निकम, चंद्रकांत रूपेकर, प्रा. सिद्धोधन मोरे, सचिन गंगावणे, मनोज वाहुळ, रतनकुमार साळवे, अशोक गरुड, मधुकर त्रिभुवन, सचिन शिंगाडे, शांतीलाल लसगरे, प्रवीण बोर्डे, शरद धनतोले, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.