प्रेयसीच्या कमाईवर अगोदर केली चैन अन् नंतर केला तिचाच खून !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:47 PM2022-03-15T12:47:56+5:302022-03-15T12:48:26+5:30
आरोपी पैसे न दिल्यास प्रेयसीला मारहाणही करीत होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले
औरंगाबाद : २ फेब्रुवारीला बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. त्या महिलेचा तिच्या प्रियकरानेच खून केला असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यात खून झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोपीच्या विरोधात रविवारी खुनाचा गुन्हा नोंदविला. तसेच आरोपीला बेड्या ठोकत न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
कविता घनश्याम ऐलुरे ऊर्फ कविता सचिन वानखेडे ऊर्फ जान्हवी (रा. मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. अजमत खान ऊर्फ कयामत अनिस खान (वय २९, रा. चंपा चौक) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ फेब्रुवारीला मध्यरात्री इच्छामणी हॉटेलजवळील मोकळ्या मैदानात एक अनोळखी महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी या महिलेस घाटीत दाखल केले. या महिलेचा ६ फेब्रुवारीला मृत्यू झाला. तोपर्यंत महिलेची ओळख पटली नाही.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, तेव्हा परिसरातील नागरिकांनी महिलेस ओळखले. अजमत खान हा महिलेसोबत राहत होता. त्याने खुनाच्या दिवशी महिलेला बेदम मारहाण केल्याचेही सांगितले. त्यावरून पोलिसांनी अजमत खान याचा शोध घेऊन ताब्यात घेत चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अजमतने महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी केल्याची कबुली दिली. त्यामुळे या प्रकरणात उपनिरीक्षक संदीप वाघ यांनी फिर्यादी होत अजमत खान याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक ब्रह्मा गिरी करीत आहेत.
मौजमजा करण्यातून वादावादी
आरोपी अजमत खान हा मृत महिलेसोबतच राहत होता. तिने कमविलेल्या पैशावर मौजमजा करायचा. तसेच पैसे न दिल्यास मारहाणही करीत होता, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. मृत महिलेने कमावलेल्या सर्वच पैशांची मागणी केल्यामुळेच वाद झाले. त्यातून त्याने जमिनीवर डोके आपटून खून केल्याचे स्पष्ट झाले.