भूमी अभिलेख कार्यालयातील बोगस चलान प्रकरणात पहिली विकेट पडली!
By मुजीब देवणीकर | Published: July 10, 2024 07:21 PM2024-07-10T19:21:20+5:302024-07-10T19:23:54+5:30
मुख्यालय सहायक राजेय सदावर्ते निलंबित, अन्य दोषींना अभय
छत्रपती संभाजीनगर : भूमी अभिलेख कार्यालयात बँकेचे बोगस चलान लावून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. या प्रकरणात उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव यांनी मुख्यालय सहायक राजेय सदावर्ते यांना निलंबित केले. या घोटाळ्यातील अन्य दोषींनाही कारणे दाखवा नोटीस, विभागीय चौकशीची घोषणा करण्यात आली होती. त्यांना अभय देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
भूमी अभिलेख विभागात जमीन मोजणीसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोजणी शुल्काचे चलान तयार करून देण्यात येते. नागरिकांनी स्वत: बँकेत जाऊन हे चलान भरणे अपेक्षित असते. काही नागरिक जागेवरच ऑनलाइन पद्धतीनेही चलान भरतात. बँकेत चलान भरले किंवा नाही, हे भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रणालीत दिसते. त्यावरून मोजणीची फाइल पुढे जाते. या विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोजणीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून थेट चलानचे पैसे घेतले. ते पैसे बँकेत न भरता खिशात घातले. चलानवर बोगस शिक्का, सही मारली. चलान फाइलला लावून शेकडो नागरिकांना माेजणीही करून दिली. चार वर्षांपासून हा ‘कुटिल’ उद्योग या विभागात सुरू होता. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल १९० प्रकरणांत मोजणी शुल्क भरले नसल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले होते. या घोटाळ्यासंदर्भात ‘लोकमत’ने ३० जूनपासून वृत्त मालिकाच सुरू केली. त्यामुळे भूमी अभिलेख विभागात एकच खळबळ उडाली. प्रकरणावर पडदा कसा टाकायचा। यावर दोषींपासून वरिष्ठांपर्यंत मंथन सुरू झाले.
तीन जणांना कारणे दाखवा
या प्रकरणात कागदी घोडे नाचविण्यासाठी कार्यालयातील मुख्यालय सहायक राजेय सदावर्ते, शिरस्तेदार नीलेश निकम, छाननी लिपिक रेणुका घोरपडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याशिवाय दुसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आल्याची घोषणा करून टाकली.
एकावरच निलंबनाची कारवाई
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा बराच अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यावर थातूरमातूर कारवाई दाखविण्यासाठी मुख्यालय सहायक राजेय सदावर्ते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि अन्य दाेषींना अभय देण्यात आल्याची चर्चा विभागात आहे.