शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला; जिल्ह्यातील १६ मंडळांत अवकाळी पाऊसाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 11:48 AM2022-03-10T11:48:08+5:302022-03-10T11:48:31+5:30
वाऱ्यासह पावसाचा जोर असल्याने गव्हाचे पीक आडवे झाले.
औरंगाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून, १६ मंडळांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली. कन्नड, सिल्लोड, सोयगाव या तीन तालुक्यांतील १६ मंडळांत अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे गहू, हरभरा, आंबा मोहराचे नुकसान झाले आहे.
कन्नड २१ मिमी, चापानेर १४ मिमी, गोळेगाव १२ मिमी, अंभई ११ मिमी, लिंबाजी चिंचोली १९ मिमी, तर करंजखेडमध्ये १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कापणीला आलेला गहू, ज्वारी पीक धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मंगळवारी सिल्लोड, सोयगावमध्ये तर बुधवारी पहाटे कन्नड तालुक्यातील मंडळांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाऱ्यासह पावसाचा जोर असल्याने गव्हाचे पीक आडवे झाले. सिल्लोड तालुक्यातील भराडी मंडळात ३ मिमी, सिल्लोड मंडळात ९ मिमी, अंभई ११ मिमी, अजिंठा ५ मिमी, गोळेगाव बुद्रुक १२ मिमी, आमठाणा ४ मिमी, निल्लोड २ मिमी, बोरगाव बाजार २ मिमी सोयगाव तालुक्यातील चारपैकी सावळद बारा मंडळांत ५ मिमी, कन्नड तालुक्यातील कन्नड मंडळात २१ मिमी, चापानेर १४ मिमी, चिकलठाण ८ मिमी, करंजखेड १४ मिमी, लिंबाजी चिंचोली १९ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हाती आली आहे.
शहरातही हलक्या सरी
शहरातही ०.३ मिमी पावसाची नोंद झाली. ढगाळ वातावरण आणि गार हवा, अशी परिस्थिती शहरात दोन दिवसांपासून आहे. सकाळी हलक्या सरी तर दुपारी ढगाळ वातावरण होते. दिवसभर शहरात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता.