‘फूड व्हॅन’च्या प्रस्तावास निवडणुकीचा ‘ब्रेक’ लागल्याने बचत गटांचा हिरमोड

By विजय सरवदे | Published: May 2, 2024 07:17 PM2024-05-02T19:17:31+5:302024-05-02T19:18:15+5:30

सव्वा कोटीच्या या प्रस्तावाचा विचार निवडणुकीनंतर होऊ शकतो, असा अंदाज

The 'food van' proposal got a 'break' in the elections, and the self-help groups were in a frenzy | ‘फूड व्हॅन’च्या प्रस्तावास निवडणुकीचा ‘ब्रेक’ लागल्याने बचत गटांचा हिरमोड

‘फूड व्हॅन’च्या प्रस्तावास निवडणुकीचा ‘ब्रेक’ लागल्याने बचत गटांचा हिरमोड

छत्रपती संभाजीनगर : बचत गटांना ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन मावळत्या आर्थिक वर्षात बारगळले आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव आता लांबणीवर पडला. दरम्यान, मार्च अखेरपूर्वी ‘फूड व्हॅन’ मिळेल, व्यवसायाची भरभराटी होईल, या आशेने देव पाण्यात ठेवून बसलेल्या बचत गटांचा मात्र पुरता हिरमोड झालाय. तरीही सव्वा कोटीच्या या प्रस्तावाचा विचार निवडणुकीनंतर होऊ शकतो, असा अंदाज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूत्रांनी बांधला आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी जिल्ह्यातील १६ बचत गटांना खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरीही दिली व १ कोटी २० लाखांचा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीसमोर सादर केला. यात दोन प्रभागसंघ आणि १४ ग्रामसंघांचा सहभाग आहे.

जिल्ह्यात १८ हजार ३८१ महिला बचत कार्यरत आहेत. तथापि, गाव व परिसरातील बचत गटांना व्यवहारात पारदर्शकता आणणे, सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा व्यवहार स्वतंत्र राहावा तसेच उत्पन्न व खर्चाचे मूल्यांकन करणे, अंदाजपत्रकावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसंघ स्थापन करण्यात आले आहेत. एका ग्रामसंघात गावातील २० ते २५ बचत गटांचा समावेश आहे. याशिवाय, जि. प. गट अथवा मतदारसंघातील बचत गटांवरील संनियंत्रणासाठी प्रभागसंघही स्थापन करण्यात आले आहेत. एका प्रभागसंघात जवळपास १० ग्रामसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यात असे ८०३ ग्रामसंघ व ४२ प्रभागसंघ कार्यरत आहेत.

खाद्यपदार्थांना चांगली मागणी
बचत गटांकडून वेगवेगळ्या पद्धतीची लोणची, चटण्या, कुरडया, पापड याप्रमाणे खाद्यपदार्थ तयार केले जात असून, त्यास नागरिकांची चांगली मागणी अनेक प्रदर्शनातून दिसून आली आहे. हे लक्षात घेऊनच मुख्य कार्यकारी अधिकारी मीना आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सिरसे यांनी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत बचत गटांना ‘फूड व्हॅन’ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आखली आहे. आठवडी बाजार, यात्रा, एमआयडीसीतील गजबजलेले चौक, शहर किंवा गर्दीच्या ठिकाणी या ‘व्हॅन’ उभ्या करून तेथे नास्ता, चहा, जेवण आदी खाद्यपदार्थांची विक्री केली जाणार आहे.

 

Web Title: The 'food van' proposal got a 'break' in the elections, and the self-help groups were in a frenzy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.