'सावकाराचा जाच,अवकाळीमुळे हतबलता'; मराठवाड्यात रोज दोन शेतकरी संपवतात जीवन
By विकास राऊत | Published: April 5, 2023 08:12 PM2023-04-05T20:12:33+5:302023-04-05T20:13:33+5:30
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले. खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली. कापसाला भाव मिळत नाही तर हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय नाही. सोयाबीनने फटका दिला. यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात असून, गेल्या ९० दिवसांत विभागात २१४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. रोज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या विभागात होत असल्याचे प्रमाण आहे.
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६५ आत्महत्या झाल्या. सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टीमुळे हातून गेलेले पीक, सरकारकडून मिळत नसलेली मदत ही कारणे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढविण्यासाठी पोषक ठरत असल्याचे बोलले जाते. विभागात बँकांकडून मिळणारे पीककर्ज सरसकट मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त व्याज घेणाऱ्या सावकारांकडे हात पसरावे लागतात.
चार वर्षांपासून अतिवृष्टी
मराठवाड्यात चार वर्षांपासून अतिवृष्टी होत असून, यामध्ये खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान दरवर्षी झाले आहे. शेतकरी आत्महत्या वाढीमागे हेदेखील कारण आहे. भरपाईसाठी चार वर्षांत १२ हजार कोटींच्या आसपास मदतनिधी शासनाने दिला.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
बीड जिल्ह्यात गेल्या ९० दिवसांत ६५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यात ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
आता प्रशासन करणार सर्व्हे.....
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, कौटुंबिक स्थितीची आगामी काळात उकल व्हावी, यासाठी ग्रामविकास, कृषी आणि महसूल प्रशासन सर्वेक्षण करणार आहे. विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. सावकारी कर्ज, नापिकी, अतिवृष्टी, मानसिक ताणासह इतर अनेक नैराश्यांचा सामना शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांची सद्य:स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सहा पानी प्रश्नावलींतून सर्व्हे करण्यात येणार आहे. सर्व्हेच्या विश्लेषणाअंती उपाययोजनांवर प्रशासन तज्ज्ञांशी चर्चा करून पुढे जाणार आहे. या सर्व्हेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील दीड हजारांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
नवीन वर्षांतील ९० दिवसांत २१४ आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : २३
जालना : १५
परभणी : १८
हिंगोली : ०५
नांदेड : ३१
बीड : ६५
लातूर : १४
धाराशिव : ४३
एकूण : २१४