घरी येताच समोरील दृश्याने बसला धक्का; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 10:36 AM2022-11-25T10:36:58+5:302022-11-25T10:37:53+5:30
पत्नी सोबत संबंध असल्याचा संशय असल्याने डोक्यात घातली लोखंडी टॉमी
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड (औरंगाबाद) : राग अनावर झाल्यावर माणूस काहीही करून बसतो. याचा प्रत्यय सिल्लोड शहरात आला. आपल्या अनुपस्थितीत मित्र घरी आल्याचे पाहताच पत्नीसोबत अनैतिक संबंध असतील या संशयातून एकाने मित्राचा खून केला. ही घटना गुरुवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील आनंद पार्कमध्ये घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेत मरण पावलेल्या इसमाचे नाव फारुकखान इब्राहिमखान पठाण ( वय ४८ वर्ष रा.सिल्लोड ) असे आहे. तर त्याचा खून करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव शामधन बैनाडे ( वय ४५ वर्ष रा. सिल्लोड) असे आहे. पोलिसांनी बैनाडेची पत्नी गीता शामधन बैनाडे ( वय ४३ वर्ष रा सिल्लोड) व इतर एकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मयत फारुख याचा उदय उर्फ मुन्ना कुळकर्णी हा मित्र आहे. मुन्ना मार्फत आनंद पार्क येथे राहणारी गीता शामधन बैनाडे हिच्या सोबत फारुखची ओळख झाली होती. २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता फारुख हा गीताला भेटण्यास आनंदपार्क येथे गेला होता. दरम्यान, रात्री ८:३० वाजेच्या सुमारास अचानक गीताचा पती शामधन घरी आला. फारुखला घरात पाहून त्याचा राग अनावर झाला. पत्नी सोबत फारुखचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय आल्याने शामधनने ट्रकमधील लोखंडी रॉड काढून फारुखच्या डोक्यात घातला. यात फारुख जागीच ठार झाला. त्यानंतर शामधन तेथून पसार झाला. या दरम्यान मुन्ना कुलकर्णीचा फारुखच्या मोबाइलवर फोन आला. तो फोन गीताने उचलला. तिने त्याला हकीगत सांगितली. मुन्नाने फारुखला सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल केले. येथे तपासून डॉक्टरांनी फारुखला मृत जाहीर केले.
अपघात झाल्याचा केला बनाव..
गीता व फारुख एकमेकांना ओळखत होते. फारुख हा गीताला भेटण्यास तिच्या घरी आला होता. पतीच्या हल्ल्यात फारुख जागीच ठार झाला. आता आपण फसू असे वाटल्याने गीताने फारुखचा मोटार सायकलवर अपघात झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आला. उलटतपासणीत गीताने गुन्ह्याची कबुली दिली.
मयत होता शिक्षक तर आरोपी ट्रक चालक
मयत फारुख पठाण हा अंधारी येथील एका शाळेत शिक्षक होता. तो सिल्लोड येथील अंबादास नगरमध्ये राहत होता. तर आरोपी शामधन बैनाडे हा ट्रक चालक आहे. फारुख व त्याची घट्ट मैत्री होती. तर फारुख आणि शामधन याची पत्नी गीता यांची ओळख होती.
तिघांवर गुन्हा दाखल
मृत फारुखचे वडील इब्राहीमखान हाजी दौलतखान पठाण ( वय ७१ वर्ष रा जामा मज्जीत सिल्लोड) यांच्या तक्रारीवरून शामधन बैनाडे, गीता शामधन बैनाडे आणि अनोळखी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खून करून शामधन रात्री ट्रक घेऊन पसार होणार होता. मात्र पोलिसांनी सापळा रचून त्याला डोंगरगाव फाट्यावर गुरुवारी मध्यरात्री अवघ्या दोन तासांच्या आत अटक केली.
घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज, ग्रामीणचे सीताराम मेहेत्रे, पोलीस उपनिरीक्षक झिंझुरडे,कर्मचारी तळेकर, तडवी, वाकेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.पंचनामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांझेंवार ,उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, कन्नड उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव , गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी घटनास्थळी भेट दिली.व आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले.आरोपी शामधन ट्रकमध्ये बसून फरार होण्याच्या तैयारीत होता त्याला डोंगरगाव फाट्याजवळ शिताफीने अटक केली.