छत्रपती संभाजीनगरात गोळीबार करणाऱ्या टोळीकडे घातक शस्त्रांचा साठा; पोलिस अनभिज्ञ कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:26 IST2025-03-25T13:24:06+5:302025-03-25T13:26:48+5:30
पत्ते आणि अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यात अडकलेल्या सुनील डुकळे याच्या तक्रारीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी उमेशने त्याला २,००० रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले होते.

छत्रपती संभाजीनगरात गोळीबार करणाऱ्या टोळीकडे घातक शस्त्रांचा साठा; पोलिस अनभिज्ञ कसे?
छत्रपती संभाजीनगर : अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांच्या टोळीत हप्तेखोरी, खंडणीवरून मुकुंदवाडीच्या झेंडा चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला. टोळीने हवेत गोळीबार करून लाकडी दांडे, कोयत्यांचा धाक दाखवून १०,००० रुपये लुटून मोठी दहशत निर्माण केल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात विकी हेल्मेट, मुकेश साळवे, किशोर शिंदे आणि उमेश गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्ते आणि अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यात अडकलेल्या सुनील डुकळे याच्या तक्रारीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी उमेशने त्याला २,००० रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले होते. त्याने नकार दिल्यामुळे त्यांच्यात वाद झाले. २३ मार्च रोजी रात्री सुनील, त्यांचा मुलगा आणि भाचा इच्छामणी हॉटेलजवळ पत्ते खेळत असताना आरोपींनी कोयते, दांडके आणि इतर धारदार शस्त्रांद्वारे त्यांच्यावर हल्ला केला. भंगाराच्या दुकानातून १०,००० रुपये हिसकावून ते पसार झाले. सोमवारी रात्रीपर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नव्हती.
छत्रपती संभाजीनगरात खंडणीवरून वादात गुन्हेगारांच्या टोळीकडून हवेत चार वेळा गोळीबार
हे प्रश्न अनुत्तरितच
-रात्रीच्या घटनेत सोमवारी सकाळी १०:४६ मिनिटांनी म्हणजेच १२ तासांनी गुन्हा का दाखल केला गेला?
-स्थानिकांच्या माहितीनुसार, घटनेदरम्यान गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने सर्वच घाबरून गेले. एफआयआरमध्ये 'अंधारात कशाचा तरी जोराने आवाज झाला' असा संशयास्पदरीत्या उल्लेख केला आहे, पोलिसांनी गोळीबारातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला.
-घटनेनंतर तेथील अवैध दुकानातील सर्व साहित्य रात्रीतून गायब झाले. ते गायब का केले गेले? तसे करण्यास कोणी सांगितले?
गँगवार! आरोपींच्या घरावर हल्ला
या घटनेनंतर एका गटाने आरोपींच्या घरावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून दगडफेक केली. या गँगवॉरमुळे परिसरात सोमवारीही तणाव होता. आरोपींच्या घरावर हल्ला कोणी केला, शस्त्रधारी गुंड कोण होते, याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले.
शस्त्रांचा साठा, पोलिस अनभिज्ञ कसे?
विकी हेल्मेट, मुकेश साळवे कुख्यात गुन्हेगार आहेत. शस्त्रांच्या धाकावर मुकुंदवाडीत ते खंडणी मागून नागरिकांना लुटतात. घातक धारदार शस्त्रांचा त्यांच्याकडे साठा आहे. सोशल मीडियावर त्यांचे जवळपास २५ पेक्षा अधिक व्हिडीओ आहेत. घटनेनंतर रात्री त्यांनी हातात शस्त्र, बंदुकीच्या केससह सेलिब्रेशन केले. मात्र, पोलिस या सगळ्यापासून आश्चर्यकारकरीत्या अनभिज्ञ राहिले. एका गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयात हातकडीसह रील तयार करून पोस्ट करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती.
सर्व बाजूंनी तपास सुरू
या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. मी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे गोळीबार झाला की नाही, याचा आम्ही सखोल तपास करत आहोत.
- प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २.