मुलीची छेड काढली, तक्रार दाखल होताच तरुणाच्या कृतीने पोलिसांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:56 AM2022-10-06T11:56:05+5:302022-10-06T12:05:59+5:30
क्रांती चौक पोलिसांनी तरुणाच्या घरी घेतली धाव
औरंगाबाद : औरंगपुऱ्यातील स.भु. मुलींच्या वसतिगृहाजवळ एका मुलीची टवाळखोराने छेड काढली. त्याची तक्रार थेट पोलिसांकडे गेल्याची माहिती होताच तरुणाने घरी जात गळफास घेत आत्महत्येचा बनाव केला. छेडछाडीचा कॉल सोडून क्रांती चौक पोलिसांनी तरुणाच्या घरी धाव घेतल्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला.
क्रांती चौक पोलिसांना स.भु. महाविद्यालयाच्या परिसरातील मुलींच्या वसतिगृहाजवळ १९ वर्षांचा साईनाथ नावाचा तरुण मुलीची छेड काढत असल्याची तक्रार मिळाली. नियंत्रण कक्षाने माहिती देताच निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी अंमलदारांना घटनास्थळी पाठवले. पोलीस पोहोचेपर्यंत साईनाथ पसार झाला. मुलीने पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाल्यामुळे तो घाबरून घरी गेला होता. स्थानिकांनी तो त्याच्या खोलीकडे गेल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी तात्काळ त्याचे घर गाठले. तेव्हा साईनाथने आत्महत्येची धमकी देऊन दरवाजा लावून घेतला होता. पोलिसांनी बाहेरून आवाज दिला. पण आतून प्रतिसाद देत नव्हता. पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा समोर साईनाथच्या खोलीत छताला साडी बांधलेली होती, तर साईनाथ जमिनीवर झोपलेला होता. पोलिसांना त्याच्या नाटकाचा संशय आला व त्यांनी त्याच्या अंगावर पाणी टाकले. पोलिसांना आपले नाटक कळल्याचा साईनाथलाही अंदाज आल्याने तो घडाघडा बोलायला लागला. साईनाथचा सगळा धिंगाणा कळाल्याने नंतर तरुणीनेदेखील तक्रार देण्यास नकार दिला.