मुलींच्या अंगावर लेझर लाईट चमकून छेडले, जाब विचारल्याने टोळक्याची तूफान दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:40 IST2024-10-14T13:38:44+5:302024-10-14T13:40:52+5:30
जाब विचारताच टोळक्याने मुलींच्या नातेवाइकांना मारहाण करीत घरावर दगडफेक केली. याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल

मुलींच्या अंगावर लेझर लाईट चमकून छेडले, जाब विचारल्याने टोळक्याची तूफान दगडफेक
छत्रपती संभाजीनगर : घराच्या गॅलरीत उभ्या असलेल्या दोन मुलींच्या अंगावर लेझर लाईट चमकून त्यांची छेड काढण्याची घटना भवानी नगरात घडली. याचा जाब विचारताच टोळक्याने घरातील सदस्यांना मारहाण करीत घरावर दगडफेक केली. ही घटना रविवारी रात्री १२ च्या सुमारास जुना मोंढा परिसरातील भवानीनगरमध्ये घडली. घटनेची माहिती समजताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी सुमित थोरात यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात मध्यरात्रीनंतर दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भवानीनगर मध्ये तीन टवाळखोर युवकांनी एका घरातील मुलींच्या अंगावर बॅटरी चमकवली. त्याचा जाब युवकांना मुर्लीच्या कुटुबातील सदस्यांनी विचारला आता, त्यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचे रूपांतर दगडफेकीत झाले. छेड काढलेल्या मुलीच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात झाली.
या घटनेची माहिती समजताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नवनीत कांवत, प्रशांत स्वामी, एसीपी धांजय पाटील, रणजित पाटील, सुदर्शन पाटील, मनोज पगारे, संपत शिंदे, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, संभाजी पवार, संदीप गुरमे, अतुल येरमे, सुनील माने यांच्यासह शेकडो पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी धाव घेतली. दंगाकाबू पथक सोबत घेऊन शांततेचे आवाहन केले. दंगा काबू पथक परिसरात गस्तीवर तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त पवार यांनी सुरक्षेसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. रात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त घटनास्थळावरून गेले. दरम्यान, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.