बाहेरून कूलर कंपनी, आत बनावट दारूचा कारखाना; कुख्यात दारू तस्कराचा प्रताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:03 IST2025-01-29T12:02:35+5:302025-01-29T12:03:27+5:30
आठ दिवसांत अनेक ढाब्यांवर पोहोचली घातक दारू

बाहेरून कूलर कंपनी, आत बनावट दारूचा कारखाना; कुख्यात दारू तस्कराचा प्रताप!
छत्रपती संभाजीनगर : नारेगावात कूलर कंपनीच्या आत बनावट दारूचा कारखाना आढळून आला. मराठवाड्यातील कुख्यात दारू तस्कर भाऊलाल देवचंद जऱ्हाडे ऊर्फ चिंग्या (३६, रा. अंबड) याने हा कारखाना उघडल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याच्या अंबडच्या शेतातील घरात छापा टाकल्यानंतर तेथेही मुख्य कारखाना उभारल्याची धक्कादायक बाब समोर आली.
नारेगावमधील कोहिनूर इंडस्ट्रीजमध्ये बनावट दारूचा कारखाना उघडल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांना प्राप्त झाली होती. त्यांच्या सूचेनवरून पथकाने २५ जानेवारी रोजी छापा मारला. येथे बनावट दारूसाठी उभारलेला सेटअप आढळून आला. शिवाय, १८० एमएलच्या दारूच्या ९६० बाटल्या, स्पिरिटचे ड्रम मिळून आले. यात काम करणारे कुंदन भगवान बोबडे (२७), आकाश दामोदर जाधव (२७, रा. चिकलठाणा), अशफाक अजीज काजी (५६, रा. कटकट गेट), शरीफ मेहबूब शेख, १९, रा. फुलंब्री) यांना अटक करण्यात आली. उपअधीक्षक गुनाजी क्षीरसागर, निरीक्षक आर. के. गुरव, आनंद चौधरी, गणेश नागवे, अनंत शेंदरकर यांनी ही कारवाई केली.
एमपीडीएतून सुटला तरीही...
चिंग्याला यापूर्वी बनावट दारूच्या तस्करीत अटक झाली होती. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने अधीक्षक झगडे यांनी एमपीडीएअंतर्गत कारागृहात टाकले होते. मात्र, त्यातून तो सहा महिन्यांतच बाहेर आला. बाहेर आल्यावर कर्नाटक पोलिसांनी त्याला पकडले होते. त्यातून जामिनावर सुटल्यावर त्याने शेतातील घरासह नारेगावात कूलरच्या कंपनीत हा जीवघेणा दारूचा कारखाना उभारला.
अनेक ढाब्यांवर जीवघेणी दारू वितरित
नारेगावच्या कारखाना चालवणाऱ्या आरोपींच्या चौकशीत तो कारखाना चिंग्याचाच असल्याचे समोर आले. त्यानंतर झगडे यांनी स्वत: त्याच्या अंबडच्या घरी छापा मारला. तेथेही मोठ्या प्रमाणात बनावट दारू आढळून आली. शहरालगत असलेल्या अनेक ढाब्यांवर त्याची ही जीवघेणी दारू वितरित होत आहे. चिंग्यासह त्याचे सर्व साथीदार या कारवाईनंतर पसार झाले.