सरकार बदलले अन् ‘पुस्तकांचे गाव’ राहिले कागदावरच; पाहणीच्या पलीकडे हालचाल शून्य

By विकास राऊत | Published: April 1, 2023 07:06 PM2023-04-01T19:06:06+5:302023-04-01T19:06:24+5:30

मराठी वाचा आणि वाचवा, यासाठी २०१७ पासून सुरू असलेली ही योजना व्यापक करण्यात आली.

The government changed and the 'village of books' remained only on paper; Zero movement beyond inspection | सरकार बदलले अन् ‘पुस्तकांचे गाव’ राहिले कागदावरच; पाहणीच्या पलीकडे हालचाल शून्य

सरकार बदलले अन् ‘पुस्तकांचे गाव’ राहिले कागदावरच; पाहणीच्या पलीकडे हालचाल शून्य

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ‘हे ऑन वे’ या वेल्स इंग्लंडमधील गावाच्या धर्तीवर राज्यात ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली असून, जिल्ह्यातील वेरूळमध्ये गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले पुस्तकांचे गाव सरकार बदलताच कागदावरच राहिले आहे. वेरूळ ग्रामपंचायतींतर्गत श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला ‘पुस्तकाचे गाव’ करण्यास शासनाने मार्च २०२२ मध्ये मान्यता दिली, परंतु उपक्रम अजूनही सुरू केलेला नाही.

पुस्तकाचे गाव उपक्रमासाठी शासनाने डिसेंबर २०२१ च्या शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत योजनेच्या विस्ताराला आर्थिक साह्य करण्याचा निर्णय घेतला होता. मराठी भाषा विभागाने याबाबत जानेवारी २०२२ मध्ये अध्यादेश जारी केला. त्यानंतर २५ मार्च रोजी सहा महसुली विभागांतून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून निवड केल्याचे शासनाने जाहीर केले होते. मराठी वाचा आणि वाचवा, यासाठी २०१७ पासून सुरू असलेली ही योजना व्यापक करण्यात आली. दरम्यान, निवड झालेल्या संस्थेची जागा पाहणी करण्यापलीकडे भाषा संचालनालयाने काहीही केलेले नाही.

यामुळे वेरूळची निवड
पर्यटनस्थळ, तीर्थक्षेत्र, वाङ्मय, साहित्य चळवळ, ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्ये, कृषी पर्यटन, पुस्तकांच्या खपात लौकिक असलेल्या गावांचा योजनेत समावेश होईल. या पूर्ण निकषांत वेरूळचा समावेश होतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर देवस्थान, जगप्रसिद्ध लेण्यांमुळे वेरूळमध्ये येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पुस्तकांचे गाव तेथे झाल्यास आणखी एक आकर्षण पर्यटकांसाठी वाढण्याच्या दृष्टीने वेरूळची निवड झाली. तंटामुक्त, वाचन संस्कृती, आदर्श गाव, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, निसर्गसंपन्नता, शांतता याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने योजनेत सहभागी होण्यास वेरूळचा प्रस्ताव दिला होता.

या ठिकाणी पुस्तकांचे गाव
लोकसहभाग, २५० चौ. फुटांची दहा दालने, जागेची सुरक्षितता, वाचकांसाठी सुविधा, संबंधित संस्थांची राज्य मराठी विकास संस्थेसोबत करार करण्याची अट आहे. एका दालनासाठी पाच लाख रुपये शासन अनुदान देण्याची तरतूद आहे. मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन, भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांचे आयोजन निवड झालेल्या संस्थांना करण्याचा नियम आहे. छत्रपती संभाजीनगर (वेरूळ), नागपूर (नवेगाव बांध), सिंधुदुर्ग (पोंभुर्ले), पुणे (अंकलखोप) या ठिकाणी पुस्तकांचे गाव सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. वेरूळसह सर्व ठिकाणच्या गावांची अशीच परिस्थिती असल्याचे समजते.

Web Title: The government changed and the 'village of books' remained only on paper; Zero movement beyond inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.