शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 07:01 AM2023-11-04T07:01:19+5:302023-11-04T07:02:07+5:30
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर यांनी २६ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी आत्मबलिदान देणाऱ्या आपतगाव आणि कडेठाण येथील तरुणांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी शासनाने दिलेले प्रत्येकी दहा लाखांचे धनादेश न वटता परत आल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघडकीस आली. नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेताच प्रशासनाने संबंधितांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे रक्कम जमा केली.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर यांनी २६ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. शासनाने गणेश यांच्या पत्नी ऊर्मिला यांच्या नावे दहा लाख रुपये मदतीचा धनादेश दिला. तसेच कडेठाण येथील रहिवासी शुभम अशोक गाडेकर या तरुणानेही आत्मबलिदान दिले होते. त्यांच्या वडिलांच्या नावेही शासनाच्या वतीने तहसीलदारांनी दहा लाखांचा धनादेश दिला होता. तो त्यांनी बँकेत जमा केला, परंतु, तो वटलाच नाही.
आरक्षणासाठी आणखी दोघांच्या आत्महत्या
लातूर/धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात घडल्या आहेत.
लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे गोविंद मधुकर देशमुख (४८) यांनी गुरुवारी दुपारी शेतात गळफास घेतला. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गोविंद देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी ७२ तास उपोषण केले होते.
मुरूम (जि. धाराशिव) येथील मोहन अंबादास बेंडकाळे (४६) यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतला. गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.