'न्यायालयातून आलेले सरकार,न्यायालयातूनच जाईल'; विनोद पाटील यांचा एकनाथ शिदेंना पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:33 PM2022-06-27T12:33:30+5:302022-06-27T12:35:46+5:30
न्यायालयीन लढाई जिंकून मराठा आरक्षणावर तोडगा काढा; विनोद पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा
औरंगाबाद: शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट तयार केला आहे. गुवाहाटी येथे सर्व बंडखोर आमदारांसह शिंदे पुढील रणनीती, न्यायालयीन लढाई याची तयारी करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उतरले आहेत. शिंदे यांच्या समर्थनात आता मराठा आरक्षणाचा याचिकाकर्ते विनोद पाटील हे देखील उतरले आहे. शिंदे यांच्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी त्यांना पाठिंबा दर्शवत न्यायालयीन लढाई जिंकून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा अशा शुभेच्छा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिल्या आहेत.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेना भावनिक, राजकीय शस्त्र वापरून बंडखोर आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीसा बजावल्या आहेत. याच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ता विनोद पाटील यांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. ''देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप केला व खुले मतदान घेण्याचा आदेश दिला. परिणामी तीन दिवसात सरकार कोसळलं.. आणि न्यायालयाच्या आदेशाचा फायदा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी झाला.आजही तसच होताना दिसतंय..सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिंदे यांच्या नावावर गटनेते पदाबाबत शिक्कामोर्तब झालं तर व्हीप काढण्याचा अधिकार त्यांचा असेल. साहजिकच ते महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात असतील. परिणामी न्यायालयातून आलेलं सरकार न्यायलायातून जाईल..अस दिसतय.'' असा दावाही पाटील यांनी केला आहे.
न्यायालयीन लढाई जिंकून आरक्षणावर तोडगा काढा
''न्यायालयातून सरकार आलं, न्यायालयातून सरकार जाईल..परंतु न्यायालयात प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..? असा सवाल पाटील यांनी केला आहे. पक्ष कुठलाही असो, सरकार व आपली खुर्ची वाचवण्यासाठी व मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. प्राणपणाने कोर्टात सुद्धा लढा देतात. मात्र हे करत असताना त्या अगोदर निवडून येण्यासाठी ज्यांची तुम्हाला मदत होते, त्या बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला विसरून जाता. ज्या तळमळीने खुर्चीसाठी झटता त्याच्या अर्ध तरी मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कष्ट कराल का? यामध्ये एक मराठा लाख मराठा असणारे एकनाथ शिंदे विजयी झाले तर आनंदच आहे. तुम्ही विजयी व्हावेत व मराठा आरक्षणाचा तोडगा आपण काढावा, अशा शुभेच्छा पाटील यांनी शिंदेंना दिल्या आहेत.