‘एक मराठा लाख मराठा’; शासनाची विकसित भारत संकल्प यात्रा ग्रामस्थांनी वेशीवरच रोखली
By विजय पाटील | Published: December 13, 2023 01:17 PM2023-12-13T13:17:07+5:302023-12-13T13:17:48+5:30
कौठा येथे सुरु आहे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण
हिंगोली: ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देत शासनाची ‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ कौठा ग्रामस्थांनी वेशीवरच रोखली. जोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत शासनाचा कोणताही कार्यक्रम गावात होऊ दिला जाणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
वसमत तालुक्यातील कौठा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तशा प्रकारचे फलक ही लावण्यात आले आहेत. कौठा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. असे असतानाच शासनाची विकसित भारत संकल्प यात्रा कौठा येथे येणार असल्याने ग्रामस्थांनी एकत्र येत ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी केली. बुधवारी यात्रेसाठी गावात आलेल्या अधिकाऱ्यांना यात्रेस प्रवेश बंदी असल्याबाबतचे लेखी निवेदन दिले. यावेळी गावातील सर्व सकल मराठा समाजबांधव ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जमला होते.
पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने १३ डिसेंबर रोजी शासनच्या विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नियोजित तारखेप्रमाणे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील अंभुरे, विस्तार अधिकारी टी. सी.कोकरे, आदिनाथ पांचाळ, मिर्झा, अंगणवाडी पर्यवेक्षिका भारती, कृषी सहाय्यक नामदेव हंबर्डे, आरोग्य पर्यवेक्षिका आर. के. पाटोळे, ग्रामसेवक डी. के. आजादे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आले होते. कौठा येथे हे सर्वजण येताच ग्रामस्थांनी त्यांना लेखी निवेदन दिले व यात्रा परत नेण्यास सांगितले. गावातील ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात येणार होता. परंतु सकल मराठा समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने यात्रा रोखली. यावेळी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.