'आमच्याकडे शासनाचे दुर्लक्ष', हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पुकारणार आंदोलन
By बापू सोळुंके | Published: September 5, 2023 07:32 PM2023-09-05T19:32:15+5:302023-09-05T19:32:31+5:30
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने १२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन
छत्रपती संभाजीनगर: हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबाच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहेत. अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे कुटुंबांना स्वत:ची घरे नाही, त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घेतले नाही, यामुळे आज आजारपणात त्यांना दवाखान्यात उपचार घेता येत नाही, अशी खंत व्यक्त करीत स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने १२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब सोळुंके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना विविध राज्यात ४० ते ५० हजार रुपये मानधन दिले जाते. तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी १० हजाराचे मानधन २० हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद मुक्ती लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना विनाअट शासकीय सेवेत घेण्याचा ४ मार्च १९९१ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या नोकरीतील अनुशेष भरुन काढावा,स्वातंत्र्यसैनिकंाना वैद्यकीय अनुदानात वाढ करावी, स्वातंत्र्यसैनिकांना घर बांंधण्यासाठी १० लाख रुपये अनुदान देण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत. हे प्रश्न सहा महिन्यात निकाली काढण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ महिन्यापूर्वी दिले होते. मात्र अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे वारसदार १२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर धरणे , रास्ता रोको, झेंडा मार्च आणि पदयात्रा आदी प्रकारची आंदोलन करणार आहोत.
एकही मागणी पूर्ण नाही
संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वारसांकडे शासनाला विसर पडला आहे. गतवर्षी विविध मागण्यासाठी मुंबईत आंदोलन केले होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप एकही मागणी पूर्ण केली नाही. या पत्रकार परिषदेला स्वतंत्रसेनानी विश्वनाथ मोहिते, बाबासाहेब कोलते , दशरथ थोरात, अशोेक पुंगळे, एकनाथ इंगळे,सुशील पाटील आदी उपस्थित होते.
असे असेल आंदोलन
-१३ मार्च रोजी सकाळी १० वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत झेंडा मार्च
-१४ सप्टेंबरी राेजी सकाळी १० वाजता उद्घोष प्रभात फेरी क्रांतीचौक ते सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकापर्यंत.
- १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील मुख्य रस्त्यावर रास्तारोको -
. -१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय करणाऱ्या जी.आर.ची होळी .-
- १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे.
-१८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे पायी पदयात्रा