विद्यापीठाच्या अधिसभेत राज्यपालांच्या निषेधाचा ठराव; ठरावावरून कुलगुरू, प्रकुलगुरूंची गोची

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:05 PM2022-03-08T14:05:38+5:302022-03-08T14:10:01+5:30

राज्यपालांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येत असल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

The governor's protest resolution in the university's senate; Vice-Chancellor, Pro Vice-Chancellor's in trouble from the resolution | विद्यापीठाच्या अधिसभेत राज्यपालांच्या निषेधाचा ठराव; ठरावावरून कुलगुरू, प्रकुलगुरूंची गोची

विद्यापीठाच्या अधिसभेत राज्यपालांच्या निषेधाचा ठराव; ठरावावरून कुलगुरू, प्रकुलगुरूंची गोची

googlenewsNext

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत केला. सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेधाचा ठराव मांडला; परंतु हा ठराव एकमताने नव्हे, तर बहुमतांनी मंजूर करण्याचा निर्णय दिल्यामुळे सदस्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांची गोची केली.

सोमवारी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठ अधिसभेची बैठक सुरू झाली. तेव्हा सुरुवातीलाच प्रा. सुनील मगरे, विजय सुबुकडे, डॉ. राजेश करपे, प्रा. भारत खैरनार, प्रा. संभाजी भोसले यांच्यासह अनेक सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांनी महापुरुषांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी सुरू केली. तब्बल १५ ते २० मिनिटे राज्यपालांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. राज्यपालांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येत असल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले यांनी एकमताने नव्हे, तर बहुमताने ठराव मंजूर केला, असे म्हणता येईल, असे संबोधित केले. त्यावरून सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला. 

शिवाजी महाराज, म. फुले, सावित्रीबाई फुले हे तुमचे आदर्श नाहीत का, तुम्ही देखील या निषेध ठरावच्या बाजूने सहभागी झाले पाहिजे, असा आग्रह धरला. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले म्हणाले की, अधिसभेच्या बैठकीचे अध्यक्ष हे कुलपती तथा महामहिम राज्यपाल असतात. त्यांनीच आमची निवड केली असून आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून येथे बसलो आहोत. त्यामुळे एकमताने नव्हे, तर बहुमताने हा ठराव पारीत झाल्याचे आम्ही त्यांना कळवितो. यावर बैठकीत बराचवेळ खल झाला. शेवटी सदस्यांनी बहुमताने ठराव मंजूर झाल्याचे मान्य करत हा ठराव राज्यपालांना विनाविलंब पाठविण्यासाठी संमती दिली.

Web Title: The governor's protest resolution in the university's senate; Vice-Chancellor, Pro Vice-Chancellor's in trouble from the resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.