मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय; गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ‘जुलूस-ए-मोहमदी’
By मुजीब देवणीकर | Published: September 19, 2023 07:44 PM2023-09-19T19:44:28+5:302023-09-19T19:46:07+5:30
शनिवार, ३० सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ. शेख मुर्तूझा यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर : प्रेषित हजरत मोहमद सल्लम यांचा जन्मदिवस २८ सप्टेंबर रोजी आहे. मुस्लीम बांधव हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त शहरात दरवर्षी ‘जुलूस-ए-मोहमदी’चे आयोजन करण्यात येते. या जुलूसमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा ईदच्या दिवशीच गणेश विसर्जन आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी जुलूस (मिरवणूक) नंतर काढावी, अशी विनंती मुस्लीम बांधवांना केली. जुलूसच्या संयोजकांनी विनंती मान्य केली. शनिवार, ३० सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ. शेख मुर्तूझा यांनी दिली.
उर्दू कॅलेंडरनुसार १२ रब्बील अव्वलच्या दिवशी प्रेषित हजरत मोहम्मद सल्लम यांचा जन्म झाला. याला ईद-ए-मिलादुन्नबी म्हटले जाते. याच दिवशी शहरात ‘जुलूस-ए-मोहमदी’चे आयोजन करण्यात येते. मागील अनेक वर्षांची ही परंपरा आहे. यंदा ईद-ए-मिलादुन्नबी २८ सप्टेंबरला आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत जुलूस-ए-मोहमदीचे आयोजन केल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकतो. गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग आणि जुलूसच्या परतीचा मार्ग एकच आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त लोहिया यांनी जुलूसच्या संयोजकांसोबत बैठक घेतली. बैठकीत जुलूस नंतर काढावा, अशी सूचना करण्यात आली. बराच विचारविनिमय केल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी जुलूसचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी असदउल्ला तर्रार, ॲड. मझहर शुत्तारी, काझी आरेफ, ॲड. जियाउद्दीन बियाबाणी, शेख आसीफ, डॉ. शेख अश्फाक इक्बाल, काझी शकील, मुर्करम बागवाला, एजाज जैदी आदींची उपस्थिती होती.
वेळ, मार्ग दरवर्षीचाच
दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी ८:३० वाजता हजरत निजामोद्दीन चौक येथून ‘जुलूस-ए-मोहमदी’ला सुरुवात होईल. शहागंज चमन, राजाबाजार, नवाबपुरा, जिन्सी, जिन्सी चौक, कैसर कॉलनी, चंपा चौक, शहाबाजार, मंजूरपुरा, लोटाकारंजा, बुढीलाईन, जुनाबाजार, सिटी चौक, सराफा, गांधी पुतळामार्गे परत हजरत निजामोद्दीन चौक येथे येईल. मिरवणूक परत आल्यानंतर ध्वजारोहण करण्यात येऊन ‘सलाम’ पढण्यात येणार आहे.
अन्नदान, सरबत वाटप
ईद-ए-मिलादुन्नबी २८ सप्टेंबरला असून, याच दिवशी शहरातील विविध वसाहतींमध्ये परंपरेनुसार अन्नदान, सरबत वाटपसह आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतील. या शिवाय पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे मुख्य रस्त्यांवर आकर्षक रोषणाई सुद्धा केली जाईल, असे डॉ. मुर्तूझा यांनी सांगितले.