‘भांगडा ते मुंगळा’ गाण्यावरच वऱ्हाडीचा ‘झिंगाट’ डान्स; ‘नागीण’ नृत्याशिवाय वरात पुढे जातच नाही
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 7, 2024 16:50 IST2024-12-07T16:49:58+5:302024-12-07T16:50:38+5:30
लग्नाची गोष्ट : एरव्ही कधी न नृत्य करणारे ‘वराती’मध्ये थिरकतात...

‘भांगडा ते मुंगळा’ गाण्यावरच वऱ्हाडीचा ‘झिंगाट’ डान्स; ‘नागीण’ नृत्याशिवाय वरात पुढे जातच नाही
छत्रपती संभाजीनगर :लग्नात सर्वांत आकर्षण असते ते ‘वराती’चे सजविलेल्या घोड्यावर बसलेला नवरदेव... समोरील बाजूस बँडपथकाच्या गाण्यावर नृत्य करीत आनंदोत्सव साजरा करणारे वऱ्हाडी... कितीही नवीन गाणे सुपरहिट होत असले तरी वरातीमध्ये ‘भांगडा ते मुंगळा’ हे गाणे वाजविल्यावरच सर्वजण ‘झिंगाट’ डान्स करतात... एरव्ही कधी न नृत्य करणारे ‘वराती’मध्ये थिरकतात... जेव्हा एक मित्र तोंडात रुमाल घेऊन पिपाणी वाजविण्याची ॲक्शन करतो व दुसरा नागीण बनून रस्त्यावर लोळतो, तेव्हा वरातीतील आनंद शिगेला जाऊन पोहोचतो... या नागीण डान्सशिवाय वरात पुढे जातच नाही...!
वरील वर्णन ऐकल्यावर सर्वांना आपल्या व इतर नातेवाईक, मित्रांच्या लग्नातील ‘वरात’ आठवली असेलच...दरवर्षी बॉलिवूडमध्ये शेकडो नवीन गाणी तयार होतात. यांतील काही गाणीच लोकप्रिय ठरतात. बाकीची विस्मरणात जातात. मात्र, बॉलिवूडमधील काही अविस्मरणीय गाणी आहेत, ती पिढ्यान्पिढ्या लग्नाच्या ‘वराती’मध्ये वाजविली जात आहेत. नव्हे, त्या गाण्यांशिवाय वरातीमध्ये रंग भरतच नाही.
मेरे देश की धरती, मेरे यार की शादी
बँड पथकातील कलाकारांनी सांगितले की, गणपतीच्या आरती वाजवतो आणि नंतर वरातीला सुरुवात होते. एक देशभक्तिपर गीत वाजविण्याची प्रथा आहे. त्यानुसार ‘मेरे देश की धरती’ हे गीत असतेच. त्यानंतर ‘मेरे यार की शादी है’ हे गाणे वाजवावेच लागते. त्यानंतर फर्माईशीनुसार गाणे वाजविले जाते; पण यात ‘मुंगळा’ गाणे वाजविल्याशिवाय रंगत येतच नाही. ‘नागीण’ गाण्यावर आम्हाला सर्वाधिक ओवाळणी मिळते. शेवटी मंगल कार्यालयात आल्यावर ‘झिंगाट’ गाण्यावर वधू-वराकडील सर्व वऱ्हाडी डान्स करतात...
शहरात कुठून येतात कलाकार ?
शहरात आजघडीला लहान-मोठी ३० बँडपथके आहेत. त्यांच्याकडे मिळून आजघडीला ५०० पेक्षा अधिक कलाकार आहेत.
इतर शहरातून पथके येतात
यात नाशिक, मनमाड, जालना, परभणी, पैठण, फुलंब्री, कन्नड, वैजापूर येथून कलाकार शहरात लग्नहंगामात मुक्कामी येतात. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था बँडपथकाचे मालक करतात. एका लग्नात १० ते २१ कलाकार बँड वाजवितात. २० हजार ते ४५ हजार रुपयांपर्यंत सुपारी घेतली जाते. याशिवाय दाट तिथीच्या दिवशी चाळीसगाव, बीड, इ. शहरांतूनही बँडपथके येतात.
- सय्यद आझम, अध्यक्ष, औरंगाबाद बँड असोसिएशन