मातीच्या भांड्यांचा वाढतोय श्रीमंती थाट; मॉडर्न किचनमध्ये मिळाले मानाचे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 08:02 PM2022-02-23T20:02:29+5:302022-02-23T20:02:49+5:30

कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे, अन्नाची नैसर्गिक चव मिळावी यासाठी ‘माती’च्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याकडे गृहिणींचा कल वाढत आहे.

The growing wealth of pottery; A place of honor in the modern kitchen | मातीच्या भांड्यांचा वाढतोय श्रीमंती थाट; मॉडर्न किचनमध्ये मिळाले मानाचे स्थान

मातीच्या भांड्यांचा वाढतोय श्रीमंती थाट; मॉडर्न किचनमध्ये मिळाले मानाचे स्थान

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या मॉडर्न किचनमध्ये मातीचे भांडे ठेवलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. कारण आता स्टीलनेस स्टील, ॲल्युमिनियम, नॉनस्टिक भांड्यांचे वर्षानुवर्षे वापराचे तोटे लक्षात येऊ लागले आहेत. कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे, अन्नाची नैसर्गिक चव मिळावी यासाठी ‘माती’च्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याकडे गृहिणींचा कल वाढत आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या ब्रँडने मातीचे भांडे बाजारात विक्रीला आले आहेत. लाल व काळ्या रंगांतही भांडी विकली जात आहेत.

मातीची भांडी का वापरावीत ?
आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांनी सांगितले की, अनेक विद्यापीठात मातीच्या भांड्यावर संशोधन सुरू आहे. मातीच्या भांड्यांतील पदार्थ शिजवल्यास त्यातील १०० टक्के पोषक तत्त्वे कायम राहतात. मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सल्फर हे घटक मिळतात. आम्लपित्तांची पातळी वाढत नाही. ॲसिडिटी होत नाही. पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत. तेलाचा वापरही कमी होतो.

ॲल्युमिनियमची भांडी नकोच
ॲल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेले अन्न वर्षानुवर्षे खाल्ल्याने कर्करोगही होऊ शकतो. पण आता बहुतेक घरांतून ती हद्दपार झाली आहेत. अशा भांड्यातील अन्न खाल्ल्यास ॲसिडिटी, पेप्टिक अल्सर, पोट फुगणे, त्वचेच्या संदर्भातील समस्या उद्भवू शकतात.

मातीची भांडी खाताहेत भाव
भांडे                         दर
वरण-भाताचे भांडे १००० रु
तवा ४०० रु
पोळी ठेवण्याचा डबा ८५० रु
हंडी २१० रु. पासून
पाण्याची बाटली ५४० रु

मातीचा तवा आणि मातीचा माठ
मातीच्या भांड्यात शिजवलेले भात-वरण अतिशय रुचकर लागतात. मातीचा सुगंध पदार्थांमध्ये उतरतो. यामुळे आता मी मातीच्या भांड्यातच स्वयंपाक करते. याचा सकारात्मक परिणाम आम्हाला जाणवत आहे. मातीची भांडे घासण्यासाठी डिटर्जंटची गरज लागत नाही. नारळाच्या शेंड्या किंवा राखेने भांडी घासले जातात. भांड्यांना व्यवस्थित वापरले तर ७ ते ८ वर्ष काहीच होत नाही. फक्त फुटू द्यायचे नाही.
- डाॅ. वृषाली देशमुख, गृहिणी

मातीच्या भांड्यांचा वापर
आमच्या घरात अनेक वर्षांपासून आम्ही मातीच्या भांड्यांचा वापर करत आहोत. आता त्यात ब्रँंडेड भांडी आली आहेत. वरण, भात करण्यास जास्त वेळ लागत नाही. गॅसवरही भांडी ठेवून स्वयंपाक करता येतो. ही भांडी महाग आहेत, पण त्याने आरोग्याला फायदा मोठा आहे. यांच्या वापराने ॲसिडिटी होत नाही.
- सोनाली डोंगरसाने, गृहिणी

 

Web Title: The growing wealth of pottery; A place of honor in the modern kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.