बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या ऐतिहासिक अजिंठा, प्रज्ञा वसतिगृहाला मिळणार झळाळी
By राम शिनगारे | Published: December 6, 2023 04:21 PM2023-12-06T16:21:03+5:302023-12-06T16:32:30+5:30
नुतनीकरणाचे काम वेगात : मुलींचे प्रज्ञा वसतिगृह, लुंबिनी नाट्यगृहाचीही होणार दुरुस्ती
छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करताना स्वत: उभे राहून बांधकाम करून घेतलेल्या ऐतिहासिक अजिंठा विद्यार्थी वसतिगृहाला पुन्हा एकदा झळाळी मिळणार आहे. या वसतिगृहाच्या नुतनीकरणाचे काम वेगात सुरू असून, येत्या शैक्षणिक वर्षांपासुन पुन्हा एकदा वसतिगृह विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे. त्याशिवाय मिलिंद महाविद्यालयातील मुलींचे प्रज्ञा वसतिगृह आणि लुंबिनी नाट्यगृहाचीही दुरुस्ती होईल, अशी माहिती प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी दिली.
मागासलेल्या मराठवाड्यात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० मध्ये पीपल्स एज्युकेशन शिक्षण संस्थेतर्फे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी केली. या महाविद्यालयाच्या बांधकामासह मुलांसाठी अजिंठा वसतिगृह, मुलीसाठी प्रज्ञा वसतिगृह आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लुंबिनी नाट्यगृह उभारले. या ऐतिहासीक वास्तू मागील काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होत्या. पडझडीमुळे अजिंठा वसतिगृहात विद्यार्थी राहत नव्हते. या तिन्ही वास्तूंचे नुतनिकरण करण्यासाठी मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार २ कोटी १५ लाख रुपयांचा निधी शासनाने दिल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी अजिंठा वसतिगृहाच्या नुतनीकरणाला सुरुवात झाली. दोन महिन्यात कामाने वेग घेतला आहे. वसतिगृहाच्या छताचे कौलारे बदलून नव्याने बसविण्यात येत आहेत. स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, खिडक्या, दारे, फरशीची दुरुस्ती केली जाणार आहे.
पर्यटन विभागाकडे ८ कोटींचा प्रस्ताव
मिलिंद महाविद्यालयातील ऐतिहासिक गार्डन, बोधीवृक्ष, भगवान बुद्धांच्या मुर्तीचे सुशोभिकरण, बाबासाहेबांच्या लाईफ हिस्ट्रीचे म्युरल्स बसविणे, लॅण्ड स्केपिंग आणि महाविद्यालयाचे दोन मुख्य प्रवेशद्वार बुद्धिस्ट कल्चरच्या डिझाईनमध्ये तयार करण्यासाठी ८ कोटी १० लाख रुपये निधी लागणार आहे. हा निधी पर्यटन विभागाने उपलब्ध करून द्यावा, यासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांना नुकताच प्रस्ताव दिला. मंत्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही प्राचार्यांनी सांगितले.
अधिकच्या निधीसाठी सुधारित प्रस्ताव
तिन्ही वास्तुच्या दुरुस्तीसाठी दिलेला निधी अत्यल्प आहे. अजिंठा वसतिगृहाचीच दुरुस्तीच खूप मोठी आहे. त्यामुळे राज्य शासनाकडे अधिकच्या निधीसाठी सुधारित प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव १० कोटी रुपयांचा असून, तो मंजुर झाल्यानंतर तिन्ही वास्तुंचे नुतनिकरण व्यवस्थित होईल. हा प्रस्ताव शासनाने लवकर मंजुर करावा.
- डॉ. वैशाली प्रधान, प्राचार्य, मिलिंद कला महाविद्यालय