जोराने हाॅर्न वाजूनही महिला रेल्वेरुळावरच; ब्रेक लागेपर्यंत ४ डब्बे अंगावरून जाऊनही सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 07:54 PM2022-05-30T19:54:15+5:302022-05-30T20:08:36+5:30
या महिलेची मानसिक प्रकृती ठिक नसल्याने महिलेला कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
औरंगाबाद : ‘ देव तारी त्याला कोण मारी’ची प्रचिती शनिवारी औरंगाबादेत आली. वेगाने धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमोर मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ रुळावर एक महिला पडलेली रेल्वे चालकाच्या निदर्शनास पडली. त्याने जोराने हाॅर्न वाजविला, तरीही ती महिला रुळावरून बाजूला जात नव्हती. ही बाब लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता रेल्वेचा वेग कमी केला. परंतु तोपर्यंत इंजिन आणि चार बाेगी महिलेच्या अंगावर गेल्या होत्या. मात्र, सुदैवाने महिलेला खरचटलेही नाही. या महिलेची मानसिक प्रकृती ठिक नसल्याने महिलेला कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तरानगरी येथील रहिवासी असलेली ४५ वर्षीय महिलेची मानसिक प्रकृती ठिक नाही. गेल्या १७ वर्षांपासून गोळ्या, औषधी, इंजेक्शन सुरु आहे. या औषधी, इंजेक्शनचा आता कंटाळाला आहे, देऊ नको, असे ती कुटुंबियांना वारंवार म्हणत असे. अनेकदा घराबाहेर गेल्यानंतर त्या वेळीच घरी येत नसे. भाजीपाला आणण्यासाठी शनिवारी सकाळी त्या पिशवी घेऊन घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या थेट मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील रुळावर पोहोचल्या. सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकडे येत होती.
या रेल्वेचा वेग साधारण ताशी १०० कि.मी. इतका होता. रेल्वेसमोर एक महिला असल्याचे रेल्वेचे लोको पायलट अमितसिंग आणि सहचालक धीरज थोरात यांच्या निदर्शनास पडले. त्यांनी रेल्वेचा प्रेशर हाॅर्न वाजविला. परंतु महिला रूळावरच पडून होती. त्यामुळे त्यांनी रेल्वेचा वेग कमी केला. तरीही चार बोगी या महिलेच्या अंगावरून गेल्या. परंतु या घटनेत महिला बालंबाल बचावली. घटनास्थळी रेल्वेचालक आणि नागरिकांनी मदतीचा हात देत महिलेला रेल्वेखालून बाहेर काढले. ही घटनेचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला.