अंत्यविधीला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; २० तोळे सोन्यासह सव्वा दोन लाखांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:39 IST2025-03-24T13:39:33+5:302025-03-24T13:39:54+5:30
याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

अंत्यविधीला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; २० तोळे सोन्यासह सव्वा दोन लाखांची रोकड लंपास
छत्रपती संभाजीनगर : नातलगाच्या अंत्यविधीला गेलेल्या कुटुंबाचे चोराने भरदिवसा घर फोडून दोन्ही मजल्यावरील खोल्यांमधून सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने आणि २ लाख २० हजार रुपये रोख, असा एकूण ७ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी (दि.२२) दुपारी एक ते चारच्या सुमारास काबरानगर, गारखेडा भागात घडली.
फिर्यादी विजेंद्र कचरू खरात (रा. प्लॉट क्र. ३८२, काबरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते पत्नी, चुलते, छोटा भाऊ यांच्यासह एकत्र कुटुंबात राहतात. शनिवारी त्यांची चुलती सविता यांच्या आईचे निधन झाल्याने सकाळी नऊच्या सुमारास विजेंद्र यांची पत्नी, वाहिनी व इतर सदस्य क्रांतीनगर येथे गेले. सकाळी अकराच्या सुमारास विजेंद्र हेदेखील घराला कुलूप लावून गेले. दुपारी लोखंडी पलंग आवश्यक असल्याने विजेंद्र आणि त्यांचा मुलगा कुलदीप हे दोघे घरी आले. पलंग घेऊन ते पुन्हा कुलूप लावून क्रांतीनगर येथे गेले. दुपारी चारच्या सुमारास अंत्यविधी झाल्यानंतर घरी आले तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पहिले तर तळ मजल्यावरील किचनमधील कपाटाचे लॉकर उचकटून चोराने २० हजारांची रोख, दोन ग्रॅमच्या अंगठ्या, साडेतीन ग्रॅमचे पेंडंट, पावणे चार ग्रॅमचे कानातले, असा ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास उपनिरीक्षक प्रशांत मुंडे करत आहेत.
पहिल्या मजल्यावरील जास्त ऐवज लंपास
पहिल्या मजल्यावर चुलते राहत असलेल्या खोलीत पाहिले. तिथे देखील कपाटातून चोराने २ लाखांची रोख, ४ तोळ्याचा नेकलेस, ३ तोळ्याचा नेकलेस, अडीच तोळ्यांचे गंठण, ५ ग्रॅमचे गंठण, ६ ग्रॅमची पोत, ५ ग्रॅमची नथ, साडेसात ग्रॅमची नाकातील नागूल, ८ ग्रॅमचे झुंबर, ४ ग्रॅमचे कुडके, साडेतीन ग्रॅमचे कानातले वेल, ५ ग्रॅमचे पेंडल आणि ५ तोळ्याच्या दोन बांगड्या असा एकूण ७ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले.