घर बंद होते अन् ड्रायव्हिंग लायसन्स परत गेले; तर काय कराल?
By साहेबराव हिवराळे | Published: October 27, 2023 05:41 PM2023-10-27T17:41:31+5:302023-10-27T17:45:02+5:30
एखाद्याचे लायसन्स परत गेल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात सध्या वाहन चालवायचा परवाना (लायसन्स) पोस्टात बुकिंग करूनच पाठविले जाते. सप्टेंबर महिन्यात आर्टिकल बुकिंगची सुविधा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई अशा तीन ठिकाणी सुरू झाली. या तीन ठिकाणांना राज्यातील इतर १४ आरटीओ कार्यालय कनेक्ट आहेत. येथून निघणारे परवाने ४ लाख ७२ हजार होते, ते संबंधितांना पाठविण्यात आले आहेत. संबंधित व्यक्ती या परवान्यासाठी तेवढीच अलर्ट असते, परंतु एखाद्याच्या घराचे दार बंद असल्यास ते परवाना पाकीट पोस्ट कार्यालयात सात दिवसांसाठी राखून ठेवले जाते.
आर्टिकल बुक केल्यापासून ते संबंधितांच्या घरी पोहोचेपर्यंत संदेश रजिस्टर केलेल्या मोबाइलवर येत असतो, पण तरीही एखाद्याचे घर यदाकदाचित बंद होते, म्हणून आर्टिकल परत जाते, पण अशा घटना किरकोळच आहेत. अनेक जण जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन त्वरित लायसन्सविषयी विचारपूस करून खात्री करून ते पोस्टाने आलेले लायसन्स मिळविण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचा मोबाइल नंबर लायसन्सला लिंक केलेला नसेल, तर त्यांना संदेश मिळत नाही. अशा तुरळक नागरिकांना लायसन्स परत गेल्याने पुन्हा परवाना मिळविण्यासाठी धावपळ करावीच लागते.
नंतर सातच दिवस राहते पोस्टात
आर्टिकल बुक झाल्यापासून पोस्टमन ते लायसन्स घरी आणून देईपर्यंत मोबाइलवर संदेश येणे सुरूच असते. घर बंद असल्यास संबंधितांचे लायसन्स त्याला मिळावे, त्याची गैरसोय होऊ नये, म्हणून पोस्टात सात दिवस ठेवले जाते. कुणी आलेच नाही, तर ते आर्टिकल पर संबंधित आरटीओ कार्यालयाला परत पाठविले जाते.
लायसन्स परत गेले, तर काय कराल?
एखाद्याचे लायसन्स परत गेल्यास त्यांनी सात दिवसाच्या आत जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे. तेथे लायसन्स मिळू शकते, परंतु त्यानंतरही ‘तो पत्ता सापडला नाही’ असा शेरा पाकिटावर मारला जातो. आरटीओ कार्यालयास जमा करावे लागते. तेथे जाऊनही चौकशी करून कागदपत्र दाखवून ते पाकीट- आर्टिकल आरटीओ विभागाच्या संबंधित खिडकीतून मिळविता येते.
आपला मोबाइल लिंक करा...
आपल्या वापरात असलेला माेबाइल नंबर, आधार, तसेच इतर गरज असलेल्या डॉक्युमेंटला जोडण्याची आवश्यकता आहे. कारण काही अडचणी येऊ नयेत, संदेशातून माहिती मिळत राहणे, अलर्ट मिळत राहणे सोयीचे होते, गैरसोय होत नाही.
- देवेंद्र परदेशी, उपसचिव, महाराष्ट्र गोवा सर्कल एनएफपीई.