औरंगाबाद मनपात खळबळ; उपोषणार्थीने अचानक रचले स्वत:चे सरण
By मुजीब देवणीकर | Published: February 24, 2023 07:49 PM2023-02-24T19:49:22+5:302023-02-24T19:49:42+5:30
उपोषणाचा ६५ वा दिवस असतानाही प्रशासन दखल घेत नसल्याने अनोखे आंदोलन
औरंगाबाद : मनपा मुख्यालयासमोर मागील ६५ दिवसांपासून चार ते पाच आंदोलक विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी सकाळी एक आंदोलक लाकडांचे सरण ठेवून प्रतिकात्मक स्वरूपात त्यावर झोपला. त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी विविध विधी करण्यास सुरूवात केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांना त्वरीत ताब्यात घेतले. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने उपोषणार्थीचा तंबु तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.
नाथा तांडगे, अय्युब खान आदी आंदोलक मनपासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या ठिकाणी एका फलकावर उपोषणाचा कितवा दिवस हे दररोज लिहण्यात येत होते. शुक्रवारी ६५ वा दिवस असतानाही प्रशासन दखल घेत नसल्याने आंदोलकाने रात्रीच लाकडं आणून ठेवली. सकाळी ११ वाजता भर रस्त्यावर सरण रचले. त्यावर नाथा तांगडे पांढरा कपडा ओढून झोपले. अन्य आंदोलकांनी मृतदेहावर ज्या पद्धतीने धार्मिक विधी करतात त्याप्रमाणे विधी करण्यास सुरूवात केली. पोलीसांनी तांगडे यांना ताब्यात घेवून सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने उपोषणार्थींचा तंबू तोडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी कडाडून विरोध केल्याने पथक निघून गेले. सायंकाळी पाच वाजता तांगडे यांना नोटीस देवून पोलीसांनी सोडून दिले. आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
..........