काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत
By बापू सोळुंके | Published: June 25, 2024 06:18 PM2024-06-25T18:18:37+5:302024-06-25T18:18:54+5:30
समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर: आंतरवाली सराटी येथील आंदोलनाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्याच्या कारणावरून डॉ. रमेश तारख यांना काळे फासण्याची घटना वाईट आहे. या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम झालं, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी नोंदविली. मोठ्या पोलीस बंदोस्तात आणि मराठा कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत ते आंतरवाली सराटीला रवाना झाले.
१३ जुनपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली झाल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते आंतरवाली सराटीला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कालच्या घटनेने मराठा आरक्षणाच्या आंदोलनला गालबोट लावण्याचं काम झाले. हे डॉ. तारख यांनाही माहिती आहे. तारख यांनी गावातल्या आंदोलनाला विरोध केला होता, त्यावर आपल्याला बोलायचं नाही. आपण बेधडक स्वभावाचे आहोत, असले प्रकार आपल्याला आवडत नाही. समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये. आपल्या आजूबाजुला संपूर्ण समाज वावरतो, यामुळे माझ्या जवळून गेल्यावर कोण काय करते हे आपल्याला माहिती नसते. पण जे झालं ते योग्य नाही, असे काळं फासण्याच्या घटनेवर जरांगे यांनी आवर्जून सांगितले.
आज गावी जाताना तुमचा पोलीस बंदोबस्त का वाढविला या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, येवलावाल्यांनी तलवारी काढण्याची भाषा केली आहे, याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली असेल, यामुळेच बंदोबस्त दिला असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. मंत्री छगन भुजबळ यांनी जातीवाद वाढविल्याचा पुनरूच्चार जरांगे यांनी केला. मात्र मंत्री शंभूराजे देसाई यांनी १३ जुलैपर्यंत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी बोलू नये,असे आवाहन केल्याने आपण बोलणार नसल्याचे ते म्हणाले. नेहमीप्रमाणे मी जसा अंतरवालीला जातो तसा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर नेते गाव खेड्यातल्या ओबीसी समाजाला विरोधक मानलं नाही आणि मानणार नसल्याचे जरांगे म्हणाले.
जुलैमध्ये पुढील दिशा
६ ते १३ जुलै दरम्यानमराठा समाज जागृत करण्यासाठी नियोजन केले आहे. आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. हे आंदोलन उभ करण्यासाठी आयुष्य घालवलं आहे. यामुळे यावर कोणी बोललं त्याला उत्तर दिलेच पाहजे असे नाही. मराठा समाजाच्या ३-४ पिढ्या यात गेल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------------------------------