छत्रपती संभाजीनगरचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर मधुर बजाज यांच्या निधनाने औद्योगिक विश्वावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:34 IST2025-04-12T16:33:38+5:302025-04-12T16:34:51+5:30

संपूर्ण उद्योगविश्वाने आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरने एक दूरदर्शी आणि सज्जन नेतृत्व गमावले आहे.

The industrial world mourns the death of Madhur Bajaj, brand ambassador of Chhatrapati Sambhajinagar. | छत्रपती संभाजीनगरचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर मधुर बजाज यांच्या निधनाने औद्योगिक विश्वावर शोककळा

छत्रपती संभाजीनगरचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर मधुर बजाज यांच्या निधनाने औद्योगिक विश्वावर शोककळा

छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये बजाज ऑटो कंपनीच्या स्थापनेपासून दिवंगत मधुर बजाज यांचा शहराशी संबंध राहिला आहे. ते काही काळ येथे वास्तव्यास होते. बजाज ऑटोमुळे मराठवाड्याचे औद्योगिक विश्व बहरले. मधुर बजाज यांच्या निधनाने छत्रपती संभाजीनगरचा जणू ब्रॅण्ड ॲम्बेसिडरच हरपला. शहराने आणि उद्योग क्षेत्राने एक दूरदृष्टीचे, संवेदनशील आणि समर्पित नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली.

खंबीर पाठिंबा काळाच्या पडद्याआड
मधुर बजाज शहराचे खऱ्या अर्थाने ब्रँड ॲम्बेसेडर होते. शहराच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या दूरदृष्टीने व निष्ठेने मोलाची भूमिका बजावली. सीएमआयएसाठी ते एक मार्गदर्शक दीपस्तंभ होते. सदैव प्रेरणा देणारे आणि सक्रिय मार्गदर्शक. सीएमआयएचे ‘बजाज भवन’ हे त्यांच्या औद्योगिक प्रगतीविषयीच्या उत्कटतेचे आणि सामूहिक प्रयत्नांवरच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ‘महा-एक्स्पो’चा यशस्वी प्रारंभ आणि त्याचा आजवरचा प्रभाव त्यांच्या खंबीर पाठिंब्याशिवाय शक्य नव्हता.
- अर्पित सावे, अध्यक्ष, सीएमआयए

भक्कम समर्थक गमावला
मधुर बजाज यांचा उद्योग निर्मिती व शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाचा पुढाकार व सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे छत्रपती संभाजीनगरने एक मार्गदर्शक, मित्र व भक्कम समर्थक गमावला आहे. सीएसएन फर्स्टच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर फर्स्ट

दूरदर्शी, संवेदनशील नेतृत्व गमावले
मधुर बजाज बजाज कंपनीच्या स्थापनेदरम्यान येथे वास्तव्यास होते. १९९०-९१ मध्ये सीएमआयएचे अध्यक्ष असताना त्यांनी महाएक्स्पोची संकल्पना मांडली, जी १९९४ मध्ये प्रत्यक्षात आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली नाथ व्हॅली स्कूल, कमलनयन बजाज रुग्णालय आणि कलासागरसारख्या उपक्रमांची पायाभरणी झाली. सीएमआयएच्या ‘बजाज भवन’ या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगीही त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या निधनामुळे शहराने आणि उद्योग क्षेत्राने दूरदर्शी, संवेदनशील आणि समर्पित नेतृत्व गमावले आहे.
-आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयए

शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा
संपूर्ण उद्योगविश्वाने आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरने एक दूरदर्शी आणि सज्जन नेतृत्व गमावले आहे. ते आपल्या शहराचे खऱ्या अर्थाने ब्रँड ॲम्बेसेडर होते. सीआयआयच्या मराठवाडा झोनल कौन्सिलची स्थापना ही त्यांचीच संकल्पना होती. शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या या थोर व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली.
-राम भोगले, ज्येष्ठ उद्योगपती

Web Title: The industrial world mourns the death of Madhur Bajaj, brand ambassador of Chhatrapati Sambhajinagar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.