ऑरिक सिटीतील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर पाच वर्षांनंतर कागदावरच

By बापू सोळुंके | Published: August 3, 2024 12:20 PM2024-08-03T12:20:12+5:302024-08-03T12:20:36+5:30

ऑरिक प्रशासनाने मात्र ‘आयसीसी’ करिता कन्सल्टन्सी नेमण्यासाठी टेंडर प्रक्रिया लवकरच राबवण्यात येत असल्याचा दावा केला.

The International Convention Center in AURIC City is on paper after five years | ऑरिक सिटीतील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर पाच वर्षांनंतर कागदावरच

ऑरिक सिटीतील इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर पाच वर्षांनंतर कागदावरच

छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर (आयसीसी) उभारण्याची घोषणा पाच वर्षांपूर्वी झाली. दीड वर्षापूर्वी या सेंटरसाठी ५० एकर जमीन देण्यात आली. मात्र, सेंटर अजूनही कागदावरच आहे.

ऑरिक प्रशासनाने मात्र ‘आयसीसी’ करिता कन्सल्टन्सी नेमण्यासाठी टेंडर प्रक्रिया लवकरच राबवण्यात येत असल्याचा दावा केला. ऑरिक सिटींतर्गत असलेल्या शेंद्रा औद्योगिक पट्टा भरल्यानंतर आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आता अथर एनर्जी, टोयटो, जेएसडब्ल्यू मोबिलिटी आणि लुब्रिझोल इंडिया लिमिटेड, अशा बड्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्योग जगतात आनंदाचे वातावरण आहे. ऑरिक सिटीमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये केली होती.

जानेवारी २०२३ मध्ये मसिआ संघटनेचा महा-एक्स्पो ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात झाला. याच्या उद्घाटन प्रसंगी शहरातील सीएमआय, मसिआ संघटनेच्या उद्योजकांनी इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरसाठी ऑरिकमध्ये जागा देण्याची मागणी लावून धरली, तेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ५० एकर जमीन देण्याची घोषणा केली होती. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही आयसीसी उभारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे मदतीची ग्वाही दिली होती. ऑरिक सिटीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी ‘आयसीसी’चे गतवर्षी शहरातील एका हॉटेलमध्ये सादरीकरण केले होते. काकाणी यांनी सादर केलेल्या ‘आयसीसी’च्या या मॉडेलवर उद्योजकांनी आक्षेप नोंदविले होते. आयसीसीमध्ये हॉटेल, लॉजिंग, शॉपिंग मॉलची आवश्यकता नाही. येथे उत्तम असे प्रदर्शन हॉल आणि अन्य सुविधा सेंटर हवे असल्याचे उद्योजकांनी नमूद केले होते. यानंतर काही दिवसांतच काकाणी यांची बदली झाली, तेव्हापासून मात्र आयसीसीची कोणतीही चर्चा ऑरिकमध्ये सुरू नाही. आयसीसी मिळविण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडल्याची चर्चा आहे.

आयसीसीसाठी लवकरच प्रोजेक्ट कन्सल्टन्सी
ऑरिक सिटीच्या शेंद्रा इंडस्ट्रीयल झोनमध्ये ५० एकरवर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरचा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रोजेक्ट कन्सल्टन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.
- मलिकनेर, व्यवस्थापकीय संचालक, एमआयटीएल.

Web Title: The International Convention Center in AURIC City is on paper after five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.