छत्रपती संभाजीनगरात ड्रेनेज सफाईचा मुद्दा ऐरणीवर;चेंबरमध्ये गुदमरून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
By मुजीब देवणीकर | Published: May 9, 2023 05:13 PM2023-05-09T17:13:39+5:302023-05-09T17:14:22+5:30
छत्रपती संभाजीनगर मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशनची यंत्रणाच नाही
छत्रपती संभाजीनगर : सलीम अली सरोवराजवळ ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गुदमरून दोन मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा ड्रेनेज सफाईचा मुद्दा ऐरणीवर आला. शहरात मागील नऊ वर्षांत वेगवेगळ्या घटनांमध्ये १२ मजुरांचा मृत्यू झाला. ड्रेनेज चेंबरमध्ये मजूर अजिबात उतरू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानंतरही कंत्राटदार मजुरांना बेधडक चेंबरमध्ये पाठवितात. मजूरही आपल्या जिवाची पर्वा न करता उतरतात, हे विशेष.
सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिकेचा (क्र. ५५३/२००३) निकाल २०१४ मध्ये लागला. ड्रेनेज चेंबरमध्ये कामगार उतरता कामा नयेत, अशी सक्त ताकीद दिली. एखाद्या घटनेत कोणी मरण पावल्यास दहा लाख रुपये भरपाई द्यावी, घटनेला जबाबदार व्यक्ती, संस्थेवर गुन्हा दाखल करावा, असेही आदेशित केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने कंत्राटदारामार्फत मजूर लावून ड्रेनेज साफ करण्याची पद्धत बंद केली. हळूहळू रॉडिंग मशीन खरेदी करण्यास सुरुवात केली. सध्या ड्रेनेज चोकअप रॉडिंग मशीन, सक्शन मशीनद्वारेच काढण्यात येते. सोमवारी घडलेल्या घटनेशी मनपाचा काहीही संबंध नाही, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम म्हणाले.
शासनाने मागविली होती माहिती
२०१३ पासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत किती मजुरांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाला, याचा तपशील नगरविकास विभागाने छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि कल्याण डोंबिवली मनपांकडून मागविला होता. या मनपांनी शासनाला अहवालही सादर केला होता.
सुरक्षेचे उपाय नाहीत
ड्रेनेज चेंबरचे झाकण उघडल्यावर ९९ टक्के कामगार सुरक्षेची साधने वापरत नाहीत. वास्तविक पाहता ऑक्सिजन, विशिष्ट कपडे, ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. प्रत्येक चेंबरमध्ये विषारी वायू साचलेला असतो. तो एवढा उग्र असतो की, कामगाराला काही सेकंदांत भोवळ येऊन तो कोसळतो. गुदमरून दगावतो.
आतापर्यंतच्या घटना
-२०१४ मध्ये मुकुंदवाडी गावात विसर्जन विहिरीतील गाळ काढताना विषारी वायूमुळे चार मजुरांचा मृत्यू झाला होता.
-२९ ऑगस्ट २०१६ रोजी हडको एन-१२ विसर्जन विहिरीजवळील ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून प्रदीप हरिश्चंद्र घुले (वय २५, रा. शताब्दीनगर) या मजुराचा मृत्यू झाला होता.
-१८ मार्च २०१९ रोजी ब्रिजवाडी-पॉवरलूम भागात ड्रेनेज चेंबरमधील पाणी ओढण्यासाठी मोटारी लावल्या. मोटार खराब झाल्याने चेंबरमध्ये उतरलेल्या चारजणांचा मृत्यू झाला होता.
- सोमवारी सलीम अली सरोवराजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून अंकुश थोरात, रावसाहेब घोरपडे यांचा मृत्यू झाला.