कोरोनावर मात करून मातृत्वाचा आनंदही; धोका पत्करून डाॅक्टर करत आहेत सुरक्षित प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 06:02 PM2022-01-20T18:02:05+5:302022-01-20T18:03:07+5:30
corona virus तिसऱ्या लाटेतही गरोदरमाता पाॅझिटिव्ह आढळून येत आहेत
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना म्हटले की सर्वसामान्य नागरिक एकमेकांपासून दूर पळतात. परंतु डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी गेल्या दोन वर्षांपासून अहोरात्र झटत आहेत. एवढेच नाही तर कोरोनाशी दोन हात करीत गरोदर मातांना मातृत्वाचा आनंदही देत आहेत. कारण गरोदर मातांनाही कोरोना गाठत आहे. पहिला, दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेतही गुंतागुंत, आव्हान ठरणारी कोरोनाबाधित गरोदर मातांची प्रसूती डाॅक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून सुकर करीत आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घाटीत कोरोना पाॅझिटिव्ह महिलेची पहिली सिझेरियन प्रसूती झाली. शहरातीलच रहिवासी या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. माता आणि बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली. डाॅ. रुपाली गायकवाड, डाॅ. संदीप माणिकट्टी, डाॅ. सलेहा कौसर, डाॅ. मयुरा कांबळे यांनी सिझेरियन प्रसूती केली. सिझेरियन प्रसूतीसह एका कोरोनाबाधित गरोदरमातेची नैसर्गिक प्रसूती झाली. मात्र, घाटीत कोरोना गरोदरमातेची प्रसूती होण्याची ही पहिली, दुसरीच घटना नाही. यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही येथील डाॅक्टरांनी कोरोना मातांच्या प्रसूती यशस्वी केल्या आहेत. अगदी कोरोनास न घाबरता.
९९ टक्के शिशु कोरोनामुक्त
घाटीत एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ३५८ कोरोनाबाधित गरोदरमातांनी उपचार घेतले. यात १९७ महिलांची घाटीत प्रसूती झाली. सुदैवाने ९९ टक्के बाळ हे कोरोनामुक्त राहिले.
गर्भवती महिला बाधित आल्यास, चिंता नको
गर्भवती कोरोना बाधित आल्यास कोणतीही चिंता करण्यासारखी परिस्थिती नसते. ज्याप्रमाणे कोरोनाचे इतर रुग्ण उपचार घेतात, त्याचप्रमाणे त्यांनाही उपचार घ्यावे लागतात. गरोदरपणात कोरोनाची लक्षणे जाणवल्यास वेळीच तपासणी करणे गरजेचे असते. माता आणि बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजारांकडे दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
गरोदरमातांच्या प्रसूतीची सुविधा
तिसऱ्या लाटेत आतापर्यंत एक नैसर्गिक आणि एक सिझेरियन प्रसूती झाली आहे. सिझेरियन झालेल्या महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. आई आणि बाळांची प्रकृती चांगली आहे. मूत्रपिंडविकार व मूत्रपिंडरोपण विभागात कोरोनाबाधित गरोदरमातांच्या प्रसूतीची सुविधा करण्यात आली आहे.
- डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी