कांदापोह्यांचा 'डब्बा लय भारी'; शाळा उघडल्या, मोंढ्यात गुजरात, छत्तीसगडहून आवक आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:21 IST2022-06-20T19:20:52+5:302022-06-20T19:21:54+5:30

औरंगाबादच्या मोंढ्यातून १० टन पोह्यांची विक्री झाली

The Kandapoha breakfast is on demand; Schools opened, demand increased | कांदापोह्यांचा 'डब्बा लय भारी'; शाळा उघडल्या, मोंढ्यात गुजरात, छत्तीसगडहून आवक आली

कांदापोह्यांचा 'डब्बा लय भारी'; शाळा उघडल्या, मोंढ्यात गुजरात, छत्तीसगडहून आवक आली

औरंगाबाद : शाळा सुरू झाल्या आणि बाजारात पोह्यांची मागणी वाढली. आता तुम्ही म्हणाल की, शाळा उघडण्याचा व पोह्यांचा काय संबंध. अहो, कांदापोहे हे झटपट तयार होत असून, ते मुलांना डब्यात देण्यासाठी महिला प्राधान्य देत आहेत. ज्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी सुरू होते, त्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या डब्यात हमखास कांदापोहे असतात.

शाळा सुरू होण्याच्या १५ दिवस आधीच शहरात गुजरात व छत्तीसगड राज्यांतून मोठ्या प्रमाणात पोह्यांची आवक झाली. पोह्यांची विक्री १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे. मागील महिन्यात दररोज ५ ते ८ टन पोहे शहरात विकले जात होते, तिथे मागील तीन दिवसांपासून वाढ होऊन ८ ते १० टन पोह्यांचा खप वाढला आहे.

डब्यात कांदापोहेच का?
डब्यात कांदापोहेच का दिले जातात, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कांदापोहे नरम असतात व खाण्यास चवदार असतात. सर्वजण याला चवीने खातात. याशिवाय पातळ पोहेसुद्धा अनेक जण खरेदी करतात. हे पोहे कच्चेच खाल्ले जातात. कोणी दुधात टाकून तर कोणी दह्यामधून हे पोहे खातात.

हातगाडीवर खमंग पोहा
शहरात पूर्वी काही मोजक्याच ठिकाणी हातगाडीवर खमंग कांदापोहे मिळत असत. पण, मागील वर्षभरात शहरातील चौकाचौकात अनेक हातगाड्यांवर खमंग पोहे मिळत आहेत. या हातगाड्यांभोवती विशेषत: सकाळच्या वेळी ग्राहकांची गर्दी उसळते. कारण १५ ते २० रुपयांत प्लेटभर पोहे मिळतात व त्यात पोट भरून जाते. कर्मचारी, कामगार, विद्यार्थी यांचा सकाळचा नाश्ता पोहे हाच असतो.

२०० रुपयांनी वधारला पोहा
उन्हाळी धानाचे उत्पादन कमी झाल्याने व मागणी वाढल्याने घाऊक विक्रीत क्विंटलमागे पोह्यांचे भाव १०० ते २०० रुपयांनी वाढले. यात सुट्टे पोहे ३,२०० ते ३,८०० रुपये, तर पॅकिंगमधील पोहे ४,२०० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल विकले जात आहेत. किरकोळ विक्रीत पोहे ४२ ते ४६ रुपये किलोने विकले जात आहेत.

महिनाभर पुरेल एवढाच पोहा खरेदी करा
दीड ते दोन महिन्यानंतर कोणत्याही पोह्यांना वास येतो. ग्राहकांनी घरात पोह्याचा साठा करू नये. महिन्याभरात जेवढे पोहे लागतात, तेवढेच खरेदी करावेत.
- उमेश लड्डा, घाऊक व्यापारी

Web Title: The Kandapoha breakfast is on demand; Schools opened, demand increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.