महामार्ग ठप्प होता, कारण कळताच अंबादास दानवे थेट शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 02:22 PM2022-08-20T14:22:05+5:302022-08-20T14:23:35+5:30
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते थेट शेतकरी आंदोलनात सामील झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
गंगापूर ( औरंगाबाद ): अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांचे आज वैजापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू होते. यामुळे महार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या मार्गावरून जात होते. त्यांना आंदोलनाची माहिती मिळताच ते देखील शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले. मागण्या जाणून घेऊन त्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले.
जुलै -ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील मांजरी महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रु. नुकसाभरपाईची देण्यात यावी व इतर प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी मांजरी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी ११ वा. वाल्मीक सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर मार्गावर रास्ता रोको सुरू केला होता. आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत होते, नेते मनोगत व्यक्त करत होते. यावेळी दोन्ही बाजूने मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या मार्गावरून वैजापूर येथे माजी आमदार आर.एम.वाणी यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी जात होते. महामार्ग ठप्प असल्याने त्यांनी माहिती घेतली. कारण कळताच दानवे गाडीतून उतरून थेट शेतकऱ्यांच्या आंदोलनात सामील झाले.
शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेत विधान परिषदेत मांडू, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दानवे यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर दानवे पुढे रवाना झाले. मात्र, रत्यावर सुरू असलेल्या आंदोलनात थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतच सामील झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. आंदोलनामुळे येवला करमाड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.