तिन्ही पक्षातील नेत्यांची नसती बडबड; ना राहील महाविकास आघाडी ना वज्रमूठ: संदीपान भुमरे
By बापू सोळुंके | Published: May 5, 2023 05:54 PM2023-05-05T17:54:46+5:302023-05-05T17:55:37+5:30
राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही.
छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका, नाना पटोले आणि अजीतदादा पवार यांनी संजय राऊतांवर केलेली टिका आणि राऊतांची बडबड पहाता आता महाविकास आघाडी राहणार नाही आणि यापुढे त्यांच्या वज्रमूठ सभाही होणार नसल्याचा दावा, राज्याचे राेहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप युतीने जिंकल्या आहेत. राज्यातील जनतेला आता कळून चुकले की, हे तिन्ही पक्ष प्रेमाने एकत्र आलेले नाही. यामुळे बाजार समिती निवडणूकीत मतदारांनी त्यांना नाकारले आहे.
वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आल्याकडे तुम्ही कसे पहाता या प्रश्नाचे उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले की, आता महाविकास आघडीच राहणार नाही, उद्धव ठाकरे हे दोन दिवसच मंत्रालयात आले होते, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्षनेते अजीतदादा यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर राऊतही त्यांच्याविषयी बोलत असतात.यावरून महाविकास आघाडी एकत्र राहिले असे वाटत नाही. यामुळे यापुढे वज्रमूठ सभा होणारच नसल्याचा दावाही त्यांनी केला.