सहा दिवसांसाठी सिडको उड्डाणपुलाची डावी, तर पाच दिवसांसाठी उजवी बाजू बंद राहणार
By सुमित डोळे | Published: April 16, 2024 12:14 PM2024-04-16T12:14:20+5:302024-04-16T12:15:19+5:30
रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत या कामासाठी ठराविक टप्प्यांवर वाहतुकीसाठी हा पूल बंद असेल.
छत्रपती संभाजीनगर : डागडुजीच्या कामानिमित्त सिडको उड्डाणपुलाची डावी बाजू सहा दिवसांसाठी, तर उजवी बाजू पाच दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. काही महिन्यांपूर्वीच सिडको उड्डाणपुलावरील डागडुजीचे काम करण्यात आले. त्यादरम्यान मात्र कंत्राटदाराने कामात दिरंगाई केल्याने पुलाच्या खालील दोन्ही बाजूस वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. परिणामी, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.
आता पुन्हा पुलावर थर्मोप्लास्टिकचे पट्टे मारले जाणार असून, रस्त्यावर कॅट आइज रोड स्टड (छोटे रिफ्लेक्टर) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नांदेडच्या कंपनीकडून हे काम केले जाणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत या कामासाठी ठराविक टप्प्यांवर वाहतुकीसाठी हा पूल बंद असेल. यादरम्यान पुलाखालची बाजू मात्र वाहतुकीसाठी सुरू राहील, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी दिली.
असा असेल बदल
- १८ ते २३ एप्रिलदरम्यान सिडको उड्डाणपुलाची डावी (सेव्हनहिलकडून जालन्याकडे जाणारी बाजू) वाहतुकीसाठी बंद राहील.
- २४ ते २८ एप्रिलदरम्यान सिडको उड्डाणपुलाची उजवी (मुकुंदवाडीकडून सेव्हनहिल पुलाच्या दिशेने जाणारी बाजू) वाहतुकीसाठी बंद राहील.