रुग्णांचा प्राण वाचविणाऱ्या नर्सचाही नायलाॅन मांजामुळे जीव धोक्यात, गळ्याला खोलवर जखम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:30 IST2025-01-03T16:30:20+5:302025-01-03T16:30:37+5:30
नायलाॅन मांजाने परिचारिकेचा कापला गळा; मुलीच्या प्रसंगावधानाने प्राण वाचले

रुग्णांचा प्राण वाचविणाऱ्या नर्सचाही नायलाॅन मांजामुळे जीव धोक्यात, गळ्याला खोलवर जखम
छत्रपती संभाजीनगर : नायलाॅन मांजाने गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिक जखमी होण्याच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे, दररोज अनेक रुग्णांचा जीव वाचविण्याचे काम करणाऱ्या घाटी रुग्णालयातील वरिष्ठ अधिपरिचारिकेचा गळा नायलाॅन मांजामुळे कापला गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी न्यू पहाडसिंगपुरा परिसरात घडली.
ज्ञानेश्वरी आशिष घोडके असे नायलाॅन मांजामुळे जखमी झालेल्या अधिपरिचारिकेचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून मुलीला भरतनाट्यच्या क्लासला सोडण्यासाठी त्या जात होत्या. मुलगी पाठीमागे बसली होती. अचानक त्यांच्यासमोर मांजा आला आणि काही कळण्याच्या आत त्यांचा गळा कापला गेला. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
...अन् मोठी जखम टळली
रस्त्याच्या ऐन चढावरच ज्ञानेश्वरी यांच्या गळ्यात मांजा अडकला. चढामुळे दुचाकी जागेवर थांबविता येत नव्हती आणि मांजामुळे पुढेही जाता येत नव्हते. ही बाब लक्षात येताच मागे बसलेल्या मुलीने त्यांच्या गळ्यात अडकलेला मांजा हाताने दूर केला. त्यामुळे मोठी जखम होण्यापासून टळले, असे आशिष घोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नायलाॅन मांजाचा बंदोबस्त करा
रुग्णांचे जीव वाचविण्याचे काम करणाऱ्यांचाही नायलाॅन मांजामुळे जीव धोक्यात येत आहे. नायलाॅन मांजा सहजपणे विकला जात जात आहे. यावर धडक कारवाई करून नायलाॅन मांजाचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची गरज आहे.
- इंदुमती थोरात, सचिव, शासकीय परिचारिका संघटना