हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:24 IST2025-01-10T16:06:10+5:302025-01-10T16:24:55+5:30
देशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे.

हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे
छत्रपती संभाजीनगर : हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट, असा हितोपदेश गुरुवारी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्योगपतींच्या सन्मान सोहळ्यात केला.
राज्यपाल बागडे म्हणाले, दर्डा परिवार मुळात दोनशे वर्षांपूर्वी राजस्थानाहून आले. आणि यवतमाळला ते कॉटन किंग झाले. तिकडे मी त्यांचे गाव शोधले. तिथल्या सरपंचाशी बोललो. तुला काय पाहिजे ते सांग, असे मी त्याला सांगितले. राजेंद्रबाबूंना तुमच्या मूळ गावी शाळा बांधून द्या, असे मी त्यांना बोललो. त्यास ते तयार झाले आहेत. (टाळ्या) मागे इकडच्या मारवाडी समाजाने सत्कार केला. त्यावेळी त्यांनाही म्हणालो, गावाकडे येत जा. (हशा व टाळ्या) तिथल्या प्रवासी संघटनेचा (राजस्थान सोडून अन्यत्र उद्योगधंदा करणारे) कार्यक्रम झाला. त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगितले, देशभर पांगलेल्या लोकांना गाठा आणि इकडे गुंतवणूक करायला सांगा. (टाळ्या)
मराठवाड्यात अन्यत्र कारखानदारी वाढली नाही
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरच्या अवतीभवती औद्योगिक क्षेत्र आहे. मराठवाड्याच्या जिल्ह्याजिल्ह्यांत व छत्रपती संभाजीनगरच्या तालुक्यांमध्ये कारखानदारी वाढलेली नाही. बजाज कारखाना सुरू झाला आणि सहा महिन्यांतच संप सुरू झाला. ते योग्य नव्हते. कारखाना जरा वाढू द्या मग हक्क मागा. हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी ठेवा. (जोरदार टाळ्या) ना शाळांतून ना कुठून कर्तव्याबद्दलचे प्रशिक्षण झाले नाही.
गावचा विकास म्हणजे भारताचा विकास
देशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे. पूर्वी ८० ते ९० टक्के लोकांचा व्यवसाय शेतीच होता. गावचा विकास हा भारताचा विकास. गावात काय उद्योग सुरू करता येतील, याचा विचार झाला पाहिजे. मध गोळा करणे व स्वत:चे कपडे स्वत: शिवणे, असे हस्त उद्योग करता आले पाहिजे.
नापीक जमिनीवर उद्योग हवेत
राष्ट्राची शेती वाढणार नाही. गावचे शिवारही वाढणार नाही. आता घरांसाठी, उद्योगांसाठी नापीक जमीन वा डोंगरांची जमीन वापरता आली पाहिजे. अन्न देणारी जमीन यात गुंतवता कामा नये, असे माझे मत आहे. आता लोकसंख्या वाढत आहे. ती वाढतच राहणार आहे. अन्नधान्यासाठी जमिनी शिल्लक ठेवाव्या लागतात. नापीक जमिनीवर उद्योग उभारून सरकारने विमानतळापासून सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे.
विकसित भारताचं स्वप्न साकार करा
२०४७ साली देश विकसित व्हावा, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. आपण सगळे जण या मानसिकतेत आलो पाहिजे. कोरोना काळात उद्योगपतींना अनेक कर्ज सुविधा दिल्या. मोदी आले तेव्हा देशाचा क्रमांक ११वा होता. आता तो पाचवा आहे. लवकरच तिसरा येईल, अशी अपेक्षा आहे.
उदयपूरला या
‘लोकमत’ सर्वत्र आहे. उदयपूरला या, असे मी म्हटलेय. ‘लोकमत’च्या अनेक बातम्या माझ्या स्मरणात आहेत; पण किसनगडची बातमी व फोटो माझ्या लक्षात आहे. शेजारच्या देशातून आमची जनावरे पळवून नेतात, म्हणून औताला माणसे जुंपावी लागली, अशी ती बातमी होती. ५२ डिग्री तापमानात राहणाऱ्या लोकांना मी जाणीवपूर्वक भेटलो.