लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 03:46 PM2024-08-10T15:46:23+5:302024-08-10T15:48:25+5:30

छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.

The lok sabha vote in Maharashtra was against Modi Shah says mns Raj Thackeray | लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित

लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित

Raj Thackeray On MVA ( Marathi News ) : "लोकसभेचा जो महाराष्ट्रातील निकाल आला त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असं वाटलं की मराठवाड्यात आपल्यामुळे महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालं. मात्र या दोन्ही नेत्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, ते मतदान तुमच्या प्रेमाखातर मिळालेलं नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधातील मतदान होतं. विरोधक जिंकत नसतात, सत्ताधारी हरत असतात, हे मी नेहमी सांगतो. यावेळी देशात मुस्लीम समाजाने मोदींविरोधात मोठ्या प्रमाणात मतदान केलं, तसंच दलित बांधवांनीही संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावर भाजपविरोधात मतदान केलं. त्यामुळेच असा निकाल लागला आहे. मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा गैरसमज झाला आहे. त्यांना असं वाटतंय की विधानसभेलाही आपल्याला असं मतदान होईल. त्यामुळेच जातीचं राजकारण केलं जात आहे," अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे.

राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत त्यांना ठिकठिकाणी विरोध दर्शवण्यात आला. बीड इथं काल राज यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्याने मोठा गदारोळही झाला होता. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. तसंच माझ्या नादी लागू नका, अन्यथा माझं मोहोळ उठल्यास तुम्हाला परवडणार नाही, अशा सज्जड इशाराही दिला आहे.

"आर्थिक निकषावर आरक्षण ही आमची भूमिका"

आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, "माझा पक्ष स्थापन झाल्यापासून आमची भूमिका आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर मिळायला हवं. तीच भूमिका अजूनही कामय आहे. जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना वर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. खरंतर महाराष्ट्रासारख्या राज्यात आरक्षणाचीच गरज नाही, असं माझं मत आहे. कारण देशातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा आपलं राज्य अधिक समृद्ध असून इथं आपल्या लोकांना नोकऱ्या आणि शिक्षण देता येऊ शकतं. मात्र बाहेरच्या लोकांना या नोकऱ्या दिल्या जात आहेत," असं राज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखाला मार मार मारला. बरं झालं पोलीस मध्ये पडले. मात्र त्याला मारल्यानंतर तो एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देऊ लागला. म्हणजे यांना हे सगळं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत असल्याचं दाखून जरांगे पाटलांच्या आडून राजकारण करायचं आहे. ही गोष्टी राज्यातील जनतेनं समजून घेतली पाहिजे," असंही राज ठाकरे म्हणाले.

Web Title: The lok sabha vote in Maharashtra was against Modi Shah says mns Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.