नाष्टा आणतो सांगून प्रियकर खुनाचा प्लॅन करून आला; प्रेयसीचे शीर, हात लपवले गोडाऊनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:22 PM2022-08-19T13:22:57+5:302022-08-19T13:23:36+5:30
प्रेयसीची क्रूर हत्या प्रकरण : दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
औरंगाबाद : प्रेयसीची हत्या केल्यानंतर धडावेगळे केलेले मुंडके, हात घेऊन प्रियकर सौरभ लाखे याने स्वत:च्या फर्निचर दुकानाच्या गोडाऊनमध्ये लपवून ठेवले होते. याच गोडाऊनमध्ये त्याने मृत अंकिताला १४ ऑगस्टच्या रात्री ठेवले होते. तेथूनच मित्रासोबत गाडीत घेऊन औरंगाबादेत आल्यानंतर तिची गळा दाबून १५ ऑगस्टच्या सकाळी हत्या केली होती. सिडको पोलिसांनी अटक केलेल्या दोन आराेपींना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
सौरभ बंडू लाखे (रा. शिऊर) याचे अंकिता श्रीवास्तव हिच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. दोघांची घरे शेजारीच असल्यामुळे दोन्ही कुटुंबांसह संपूर्ण गावालाच दोघांच्या संबंधांची माहिती होती. यातूनच अंकिताने नवऱ्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. तिला सौरभने औरंगाबादेतील नवजीवन कॉलनीत भाड्याने खोली घेऊन दिली होती. दोन महिन्यांपासून अंकिता तेथे होती. सौरभ गावाकडून नियमितपणे येत होता. अंकितास अशा पद्धतीने राहणे मान्य नव्हते. तिने सौरभकडे लग्नाचा तगादा लावला होता. १४ ऑगस्ट रोजी ती शिऊरला गेली होती. त्या रात्री सौरभने तिला स्वत:च्या फर्निचरच्या गोडाऊनमध्ये ठेवले. तेथूनच पहाटे साडेचार वाजता सौरभ याने मित्राला गाडीसह बोलावून घेत तिघेजण औरंगाबादला आले. अंकिताला खोलीवर सोडल्यानंतर ती सौरभला जाऊ देत नव्हती. यापुढे मी तुझ्यासोबतच राहीन, असा हट्टही तिने धरला होता. तेव्हा सौरभने बाहेर जाऊन नाष्टा घेऊन येतो, असे सांगितले.
मित्रासोबत तो बाहेर गेल्यानंतर खून करण्याची योजना बनवूनच परतला. त्याने मित्राच्या मदतीने अंकिताचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस चौकशीत मान्य केले. त्याच दिवशी त्याने रात्री उशिरा अंकिताचा मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीचालकाने त्यास नकार दिल्यामुळे पुन्हा मृतदेह खोलीत ठेवला. १६ ऑगस्ट रोजी दुचाकीवर येत हत्याराने अंकिताचे मुंडके, हात कापून नेत तिला १४ ऑगस्टच्या रात्री ठेवलेल्या गोडाऊनमध्ये अवयव लपवून ठेवले. त्याठिकाणी तपास अधिकारी निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या पथकाने मध्यरात्री आरोपींना अटक केल्यानंतर नेले. सौरभने लपवून ठेवलेले मुंडके आणि हात दाखवले. पोलिसांनी ते जप्त करीत घाटी रुग्णालयात दाखल केले.
आरोपींची संख्या वाढणार
सिडको पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभ लाखे याच्यासह गाडीतून मृतदेह घेऊन जाण्यास मदत करणारा त्याचा मित्र सुनील गंगाधर धनेश्वर या दोघांना अटक केली आहे. याशिवाय मन्वर उस्मान शहा (रा. शिऊर) हा फरार आहे. अटक आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले. गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी, फरार मित्राला अटक करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली. न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली.
अंकितावर घेत होता संशय
अंकिता नवऱ्यापासून विभक्त होत सौरभसाठी औरंगाबादेत येऊन राहत होती. मात्र, तिचे तिसऱ्यासोबतच सूत जुळल्याचा संशय सौरभला होता. त्यातूनही त्याने तिला संपविण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत. दोघांच्या कॉल डिटेल्समधून या बाबींचा उलगडा होणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.