प्रेयसीने विश्वास ठेवून कपाट उघडले; संधी साधत प्रियकराने १२ तोळे सोने पळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:13 PM2022-03-24T19:13:16+5:302022-03-24T19:13:53+5:30

मुंबईत सोने हिसकावून गाठले औरंगाबाद : गुन्हे शाखेच्या पथकाने आठ महिन्यांनी ठोकल्या बेड्या

The lover took 12 ounces of gold from his beloved's house and fled; He was found in Aurangabad after eight months | प्रेयसीने विश्वास ठेवून कपाट उघडले; संधी साधत प्रियकराने १२ तोळे सोने पळवले

प्रेयसीने विश्वास ठेवून कपाट उघडले; संधी साधत प्रियकराने १२ तोळे सोने पळवले

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील एका युवकाने मुंबईतील १६ वर्षांच्या मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गावाकडे लग्न असल्याचे सांगून प्रेयसीला तिच्या आईची एक सोन्याची पोत मागितली. तिनेही प्रेमासाठी तत्काळ होकार दिला. कपाटातील १२ तोळे सोने पाहून प्रियकराच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने सोन्याची पिशवीच हिसकावून पोबारा केला. तब्बल आठ महिन्यांनी प्रियकरास औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

प्रफुल्ल रमेश जगताप (२१, रा. माऊलीनगर, बीड बायपास) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रफुल्ल मुंबईतील गोवंडी भागातील इमारतीमध्ये राहत होता. त्याच इमारतीमधील व्यावसायिक दाम्पत्याच्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ऑगस्ट २०२१ मध्ये त्याने प्रेयसीला आपल्या घरी कार्यक्रम असल्याचे सांगितले. तिच्या आईची एक सोन्याची पोत आपल्या आईला घालण्यासाठी देण्याची मागणी केली. तिने कपाट उघडले. १२ वर्षांच्या लहान भावासमोरच तिने एक पोत देण्यासाठी पिशवी काढली. त्यात १२ तोळे सोन्याचे दागिने होते. ते पाहून प्रफुल्लने प्रेयसीला धक्का देत तिच्या हातातून सोन्याची पिशवी हिसकावून पळ काढला. मुलीच्या आईला काही दिवसांनी सोने कपाटात दिसले नाही. त्यामुळे मुलांना विचारपूस केल्यानंतर या प्रकाराचा भंडाफोड झाला. 

या प्रकरणी शिवाजीनगर, मुंबई पोलीस ठाण्यात प्रफुल्लच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. प्रफुल्ल सापडत नव्हता. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना तो बीड बायपास परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शेळके, सहायक फाैजदार रमाकांत पटारे, हवालदार विजय निकम, राजेंद्र साळुंके, संदीप सानप, नितीन देशमुख यांच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. आरोपीने कबुली दिल्यानंतर त्यास मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

एक नव्हे अनेक गर्लफ्रेंड
आरोपी प्रफुल्लने चोरलेले १२ तोळे सोने एका दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने एका सोनाराकडे गहाण ठेवले आहे. याशिवाय त्याच्या मोबाइलमध्ये अनेक गर्लफ्रेंडची छायाचित्रे पोलिसांच्या चौकशीत आढळून आली. एकीला फसवले. दुसरीच्या मदतीने सोने गहाण ठेवले. त्याशिवाय इतरही मुलींना फसवत असल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली.

Web Title: The lover took 12 ounces of gold from his beloved's house and fled; He was found in Aurangabad after eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.