शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष, डॉक्टर कुटुंबाचे ९० लाख घेऊन तरुण पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 05:44 PM2024-03-23T17:44:16+5:302024-03-23T17:44:48+5:30
नऊ महिने २० लाख रुपयांचा परतावा देऊन पसार
छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटच्या गुंतवणुकीवर ४.५ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून वृषभ अनिल अजमेरा (२९, रा. शहागंज) याने एका डॉक्टरसह त्यांच्या कुटुंबाला ९० लाख रुपयांना गंडा घातला. नऊ महिने २० लाख रुपयांचा परतावा देऊन तो पसार झाला. गुरुवारी त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भूलतज्ज्ञ डॉ. मुराद मोहंमद अली कुडचीवाला हे शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये कर्तव्य बजावतात. कामानिमित्त डॉ. रमेश बडजात्यांच्या भावना नर्सिंग होममध्ये त्यांचे नेहमी जाणे होत होते. त्यातूनच त्यांची रुग्णालयातील प्रीतम मेडिकल चालवणाऱ्या वृषभसोबत ओळख झाली होती. त्याने त्यांना अल्गो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवून २ जून, २०२२ रोजी पहिल्यांदा डॉ. मुराद यांनी आई व मुलीच्या नावे प्रत्येकी ५ लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्याने ४.५ टक्क्यांप्रमाणे परतावा देणे सुरू केले. त्यामुळे त्यांच्यात चांगले संबंध निर्माण झाले. डॉ. मुराद यांना परतावा मिळत असल्याने त्यांच्या नाशिक, हैदराबाद येथील बहिणींनी देखील वृषभकडे गुंतवणूक केली. असे २० लाख रोख व ७० लाख बँकेद्वारे त्याला त्यांनी दिले. मार्च, २०२३ पर्यंत वृषभने त्यांना एकूण २० लाख २८ हजार रुपयांचा परतावा देखील दिला. त्यानंतर मात्र ते बंद झाले. शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याचे सांगून पैसे देण्याचे आश्वासन दिले.
मोबाइल बंद करून पसार
वृषभचे वडील अनिल ताराचंद अजमेरा यांनी गतवर्षी ७ जुलै राेजी हर्सूल तलावात आत्महत्या केली होती. त्याच्या काही महिन्यांपूर्वीच वृषभने लाखो रुपयांचे कर्ज करून ठेवले होते. त्यात डॉ. मुराद यांनाही ९० लाख रुपयांना फसवले. त्याच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने त्यांनी काही दिवस त्याला सूट दिली; मात्र नंतर वृषभ मोबाईल बंद करून पसार झाला. त्याने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली. उपनिरीक्षक निवृत्ती गायके तपास करत आहेत.