‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल
By संतोष हिरेमठ | Published: April 29, 2024 12:14 PM2024-04-29T12:14:27+5:302024-04-29T12:18:39+5:30
महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावागावांतील, शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांना फोन करतात आणि प्रचाराची स्थिती, प्रतिसाद कसा आदींची विचारणा करतात.
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून ‘मंदिरवाला हवा की दारूवाला’ असा नारा दिला जात आहे. मद्य परवाना असल्यामुळे शिंदेसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा प्रचार ‘दारूवाला’ आणि मंदिरांना भेट देतात म्हणून चंद्रकांत खैरे यांना ‘मंदिरवाला’ असे सांगून मतदारांमध्ये प्रचार सुरू केला आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी पक्षाच्या एबी फाॅर्मसह गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे अंतिम विवरणपत्रही सादर केले. त्यात उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावे मद्यविक्री परवाने असल्याचे नमूद केले. भुमरे यांनी पूर्वीच्या उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात मद्य व्यवसाय लपविल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. यावरून दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू होत्या. हा मुद्दा मागे पडेल असे दिसत असताना आता उद्धवसेनेने चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात हाच मुद्दा उचलून धरल्याचे पाहायला मिळत आहे.
हॅलो, विचारा कोण पाहिजे?
महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावागावांतील, शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांना फोन करतात आणि प्रचाराची स्थिती, प्रतिसाद कसा आदींची विचारणा करतात. एखाद्या ठिकाणी प्रतिसाद नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगताच ‘नागरिकांना विचारा, त्यांना कोण पाहिजे, मंदिरवाला हवा की दारूवाला...’ असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.