बाजारपेठ खुलली! बोनस मिळाला अन् शहरवासीयांनी केला वीक एंड 'खरेदी के नाम'

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 4, 2023 04:45 PM2023-11-04T16:45:25+5:302023-11-04T16:50:02+5:30

ग्राहकांच्या वर्दळीने बाजारपेठ खुलली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंतेची रेषा जाऊन सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले

The market is open! Got a bonus and the city dwellers spent the weekend 'Kharedi ke Naam'. | बाजारपेठ खुलली! बोनस मिळाला अन् शहरवासीयांनी केला वीक एंड 'खरेदी के नाम'

बाजारपेठ खुलली! बोनस मिळाला अन् शहरवासीयांनी केला वीक एंड 'खरेदी के नाम'

छत्रपती संभाजीनगर : कामगारांना शुक्रवारी (३ नोव्हेंबर) बोनस मिळाला आणि त्यांनी साप्ताहिक सुटीचा दिवस ‘खरेदी के नाम’ केला. शुक्रवारी ग्राहकांच्या वर्दळीने बाजारपेठ खुलली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंतेची रेषा जाऊन सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.

गेल्या आठवडाभरात मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बाजारपेठेला बसला होता. दिवाळी तोंडावर येऊन ठेपली तरी गुरुवारपर्यंत बाजारात तुरळक ग्राहक बघण्यास मिळाले, पण आंदोलन काल सायंकाळी मागे घेण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला. औद्योगिक क्षेत्रात बहुतांश कामगारांच्या हाती बोनस पडला आहे. शुक्रवारी सहकुटुंब खरेदीसाठी कामगार बाजारपेठेत दाखल झाले होते. यामुळे सकाळपासूनच पैठण गेट ते सिटी चौकापर्यंतची बाजारपेठ खुलून गेली होती. याशिवाय सिडको-हडको, जवाहर कॉलनीतील त्रिमूर्ती चौक या परिसरातही खरेदीसाठी गर्दी दिसून आली. सायंकाळनंतर तर गर्दीत मोठी भर पडली होती.

कपडे खरेदीला प्राधान्य
शुक्रवारी ग्राहकांनी कपडे, साड्या खरेदीला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे रेडिमेड कपड्याच्या शोरूममध्ये गर्दी होतीच शिवाय कापड खरेदी करतानाही अनेक ग्राहक दिसून आले. रेडिमेडमध्येही लहान मुलांचे कपडे खरेदीला पहिले प्राधान्य देण्यात आले. यामुळे लहान मुलांच्या कापड्याच्या शोरूममध्ये मोठी गर्दी उसळली होती.

आकाशकंदील, कृत्रिम हार खरेदी
एकीकडे कपडे खरेदी केले जात होते. त्याचवेळी आकाशकंदीलही खरेदी केले जात होते. बाजारात नवनवीन शेकडो डिझाईनचे आकाशकंदील आल्याने त्यातून एक आकाशकंदील खरेदी करणे ग्राहकांना कठीण जात होते. घरावर लावण्यासाठी कृत्रिम हाराचे तोरण आवर्जून खरेदी केले जात होते. दुकानातच नव्हे तर शहराबाहेरील रस्त्यावर विशेषत: संग्रामनगर उड्डाणपूल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कृत्रिम तोरण विक्रीला आले आहेत.

एसटी सुरू झाल्याने ग्रामीण ग्राहक बाजारात
आरक्षण आंदोलन मागे घेतल्यानंतर आज शुक्रवारी एसटी महामंडळाने आपल्या बसेस पूर्ववत सुरू केल्या. यामुळे शुक्रवारी ग्रामीण भागातील ग्राहक मोठ्या संख्येने शहरात खरेदीसाठी आले. यामुळे खरेदीसाठी गर्दी वाढली.

दिवसभरात २०० कोटींची उलाढाल
आज दिवसभरात सर्व बाजारपेठेत २०० कोटींची उलाढाल झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. कारण, थांबलेले ग्राहक पुन्हा सुरू झाले. दृष्काळ व आंदोलनाचा उलाढालीवर परिणाम होतो की काय, अशी भीती व्यापाऱ्यांच्या मनात होती, पण ती भीती आता निघून गेली व पुन्हा नव्या जोशाने खरेदी उत्सव सुरू झाला. एसटी बसेस पूर्ववत सुरू झाल्याने ग्रामीण भागातूनही ग्राहक आज शहरात आले, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी यांनी दिली.

Web Title: The market is open! Got a bonus and the city dwellers spent the weekend 'Kharedi ke Naam'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.