किमतीचा काय हा घोळ! औषधी एकच; पण किमती वेगवेगळ्या; खरी किमत कोणती?
By संतोष हिरेमठ | Published: May 30, 2024 07:01 PM2024-05-30T19:01:56+5:302024-05-30T19:04:51+5:30
औषधींच्या किमतीचा काय हा घोळ; कुठे ‘एमआरपी’वरच, तर कुठे ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात विक्री
छत्रपती संभाजीनगर : एकच ब्रँडेड औषधी; पण त्यासाठी औषधी दुकानांवर वेगवेगळी किंमत मोजावी लागत आहे. कुठे ‘एमआरपी’वरच, तर कुठे ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात विक्री होत आहे. अशा परिस्थितीत औषधींवर मनमानी पद्धतीने किमत छापून ग्राहकांचा खिसा रिकामा केला जात आहे; मात्र त्यावर सरकारचे नियंत्रण नसल्याचा ओरड होत आहे.
ब्रँडेड औषधीच्या १० गोळ्यांच्या स्ट्रिपची शहरातील वेगवेगळ्या भागांतील औषधी दुकानांतून खरेदी करण्यात आली. तेव्हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रक्कम आकारण्यात आली. औषधी घेतल्यानंतर ती ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात मिळाल्याने पैशांची बचत झाल्याची भावना नातेवाइकांत निर्माण होते; परंतु तीच औषधी अन्य औषधी दुकानातून घेतली जातात, तेव्हा आणखी स्वस्तात मिळत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. ‘एमआरपी’पेक्षा स्वस्तात मिळणे चांगली गोष्ट आहे; पण ‘एमआरपी’च जास्त लिहिली जात आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यातील औषधी दुकाने -३,५००
१) समर्थनगर येथे १०१ रुपये
समर्थनगर येथील एका औषधी दुकानावर एका कंपनीच्या १० गोळ्यांच्या स्ट्रिपची मागणी करण्यात आली. त्यावर १०१.५० रुपये एमआरपी होती. औषधी विक्रेत्याने १०१ रुपये आकारले.
२) जवाहर काॅलनीत ९५ रुपये
जवाहर काॅलनीतील एका औषधी विक्रेत्याने याच गोळ्यांच्या स्ट्रिपसाठी कॅल्क्युलेटरवर हिशेब केला आणि ९५ रुपये लागतील, असे सांगितले.
३) ज्युबिली पार्कला ९० रुपये
ज्युबिली पार्क येथील औषधी विक्रेत्याने आधी ‘एमआरपी’चा दर सांगितला. त्यानंतर विक्रेत्याने या १० गोळ्यांच्या स्ट्रिपसाठी ९० रुपये आकारले.
१० रुपयांची औषधी १५० रुपयांना : पी. आर. सोमाणी
दी निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष पी. आर. सोमाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादकांकडून औषधांवर छापण्यात येणाऱ्या ‘असमान’ ‘एमआरपी’विरुद्ध लढा देत आहेत. ‘लोकमत’शी बोलताना सोमाणी म्हणाले, १० रुपयांची औषधी १५० रुपयांना विकली जात आहेत. ‘एमआरपी’वर सरकारचे नियंत्रणच नाही. औषधी कंपन्या मनमानी पद्धतीने ‘एमआरपी’ छापत आहेत. निवडणुकीनंतर त्यावर नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.
स्वत:चा नफा कमी करून डिस्काउंट
स्पर्धा वाढलेली आहे. ग्राहक डिस्काउंट मागतात. त्यामुळे डिस्काउंट दिले जाते. विक्रेते स्वत:चा नफा कमी करून डिस्काउंट देतात. मात्र, प्रत्येक जण डिस्काउंट देतो, असेही नाही.
- नितीन देशमुख, अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
जीएसटी हटविण्याची गरज
‘एमआरपी’पेक्षा अधिक पैसे घेतले जात नाही. ‘एमआरपी’पेक्षा कमी दरात औषधी विकणे हा स्पर्धेचा भाग आहे. मोठे औषधी दुकानदार ‘एमआरपी’वरच विक्री करतात. तर छोटे औषधी दुकानदार हे स्वत:चा नफा कमी करून ग्राहकांना डिस्काउंट देऊन विक्री करतात. औषधींवरील जीएसटी हटविल्यास ती अधिक स्वस्त होतील.
- अनिल महाजन, युनिट सचिव, महाराष्ट्र सेल्स ॲण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन