वेरुळ लेणीसमोरील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही;केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 06:47 PM2022-02-15T18:47:54+5:302022-02-15T18:50:00+5:30

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेण्यात आली

The monument in front of the Ellora Caves will not be removed; Assurance of Union Minister G. Kishan Reddy | वेरुळ लेणीसमोरील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही;केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आश्वासन

वेरुळ लेणीसमोरील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही;केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आश्वासन

googlenewsNext

औरंगाबाद : वेरुळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जैन कीर्तीस्तंभ हटवण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

पुरातत्त्व विभागाने वेरुळ लेणीजवळील कीर्तीस्तंभ हटवण्याचे पत्र जैन समाजाला पाठविल्याचे समजल्यानंतर देशभरातील जैन समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंबंधी ‘अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे’ राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर जी. किशन रेड्डी यांनी जैन समाजाच्या भावना दुखावतील, असा कोणताही निर्णय पुरातत्त्व विभागातर्फे केला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देऊन यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.जैन समाजाचे राष्ट्र निर्माण कार्यातील असलेले योगदान, भगवान महावीर यांचा विश्व शांतीचा संदेश देशातील सर्वांसाठीच सन्माननीय आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असे कार्य होणार नाही. यासंबंधी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक व्हिडीओ संदेशही यावेळी प्रसारित केला.

जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी कीर्तीस्तंभाची उभारणी व त्याच्या देखभालीसंबंधातील माहिती देऊन याविषयीच्या समाजाच्या भावना व्यक्त केल्या. याशिवाय देशभरातील जैन समाजाच्या प्राचीन तीर्थक्षेत्रासंबंधी पुरातत्त्व विभागाकडून येत असलेल्या अडचणी, अनेक प्राचीन मंदिरांचा प्रलंबित असलेला जीर्णोद्धार, विविध ठिकाणी उत्खननात आढळणाऱ्या जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा व मंदिरांचे अवशेष याच्या हस्तांतरणासंबंधी येणाऱ्या अडचणी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यासंदर्भात पुरातत्त्व विभाग, संस्कृती खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळासमवेत केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.यावेळी महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, महासंघाच्या आंध्र प्रदेश विभागाचे अध्यक्ष मुकेश चौहान, तेलंगणा विभागाचे अध्यक्ष विमल नहार, दिगंबर समाजाचे पदाधिकारी अशोक पहाडे, मिथुन पोरवाल आदी मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला.

Web Title: The monument in front of the Ellora Caves will not be removed; Assurance of Union Minister G. Kishan Reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.