छत्रपती संभाजीनगरातील बहुप्रतिक्षित महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:29 IST2025-04-18T12:28:45+5:302025-04-18T12:29:35+5:30
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरातील बहुप्रतिक्षित महाराणा प्रताप यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज अनावरण
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने कॅनॉट गार्डन येथे उभारलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या बहुप्रतिक्षित अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शुक्रवार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. हा पुतळा ४६ फूट उंच असून, पंचधातूने बनविण्यात आला आहे. सुमारे ९० लाख रुपयांपर्यंतचा खर्च या कामावर झाला आहे.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज मेवाड नरेश लक्ष्यराज सिंह यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची या अनावरण समारंभाला उपस्थिती राहणार आहे. गेल्या तीन दशकांपासून महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा, याची प्रतीक्षा होती. यानिमित्ताने कॅनॉटच्या महाराणा प्रताप उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. उद्यानातला महाराणा प्रताप यांचा अर्धपुतळा मागेच हटवून अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला. पण, तो झाकून ठेवला होता. दरवर्षी महाराणा प्रताप यांच्या जयंतीला राजपूत समाजबांधव व भगिनी मोठ्या प्रमाणावर अभिवादनासाठी जमत असत. तेव्हा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येत नसल्याबद्दल खंत व्यक्त करत असत.
१९९९मध्ये तत्कालीन नगरसेवक कंवरसिंग बैनाडे यांनी महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा, असा ठराव मांडला होता. त्यावेळी विद्यमान खासदार डॉ. भागवत कराड हे महापौर होते. २००६ मध्ये पुन्हा डॉ. कराड हेच महापौर झाल्यानंतर महापालिकेकडे सिडकोने जागेचे हस्तांतरण केले. तेव्हापासून या पुतळ्याची प्रतीक्षा सुरू होती. यासाठी कंवरसिंग बैनाडे यांच्यासह माजी खासदार उत्तमसिंग पवार, करणी सेनेचे देवीचंद बारवाल, नंदलाल राजपूत, एल. डी. ताटू आदी पाठपुरावा करत होते. आता पुतळ्याचे स्वप्न साकारत आहे.